Mini Tractor Subsidy:- समाजातील विविध घटक आणि शेतीसाठी राज्य सरकारच्या अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून त्या त्या समाज घटकांचे आर्थिक व सामाजिक जीवन उंचावण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
यामध्ये अनेक योजनांच्या साहाय्याने अनुदान देण्यात येते व त्या त्या समाज घटकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता प्रयत्न केले जातात. कृषी क्षेत्राचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊ लागले असून या यंत्रांमध्ये ट्रॅक्टरचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणावर केला जातो.
परंतु जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर किंमत जास्त प्रमाणात असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या ते परवडत नाही. म्हणून इच्छा असताना देखील अनेकांना ट्रॅक्टर खरेदी करता येत नाही.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांकरिता शासनाकडून ट्रॅक्टर खरेदीवर शासकीय अनुदान दिले जाते. याच अनुषंगाने आता शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली असून याकरिता 90% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात घेऊ.
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा नव बौद्ध किंवा अनुसूचित जाती घटकातील असणे गरजेचे आहे.शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर योजना राबवली जात आहे व या योजनेमधून 9 ते 18 एचपीचा मिनी ट्रॅक्टर दिला जातो.
कशा पद्धतीचे आहे ही योजना?
नोंदणीकृत बचत गटातील व्यक्तींना या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ मिळतो.तसेच मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इत्यादी करिता 90 टक्के अनुदान मिळते. एवढेच नाही तर ज्या बचत गटांना या योजनेचा लाभ मिळेल त्या बचत गटांमध्ये 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ पुरुष आणि महिला बचत गटांना देण्यात येतो. ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांवर तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे करावा लागेल अर्ज?
तुम्हाला देखील या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या ठिकाणी अर्जाचा नमुना उपलब्ध आहे व पात्र बचत गटांनी अर्ज सादर करून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.
तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू असून अर्ज करण्याच्या तारखेच्या संबंधित अधिक माहिती करिता अर्जदारांनी स्वतःच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
तुम्हाला देखील या योजने करता अर्ज करायचा असेल तर तुम्ही 20 जानेवारी 2024 पर्यंत याकरिता अर्ज करू शकतात.