कोंबडी पालन म्हणजेच कुक्कुटपालन व्यवसाय हा कमी खर्चामध्ये करता येणारा व्यवसाय असल्याकारणाने सुशिक्षित बेरोजगार तरुण देखील आता कुक्कुटपालन व्यवसाय करू लागले आहेत व यामध्ये देशी कोंबड्यांचे पालन व कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन हे आता केले जात आहे.
देशी कोंबड्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये देखील आता अनेक जाती विकसित करण्यात आलेल्या असून त्या जातींची अंडी व मांस उत्पादन क्षमता जास्त असल्याकारणाने देशी कोंबड्यांचे पालन देखील आता आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचे ठरत आहे.

देशी कोंबड्यांमध्ये कडकनाथ कोंबडीला देखील मोठी मागणी असून कडकनाथ कोंबडीची अंडी आणि मांस मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याने कडकनाथ कोंबड्यांचे पालन देखील मोठ्या प्रमाणात केले जाते.
परंतु आता या कडकनाथ कोंबडी पेक्षा सरस अशी एक नवीन प्रजात जबलपूर येथील नानाजी देशमुख प्राणी विद्यापीठाने विकसित केली असून ही जात कडकनाथ आणि जबलपूरच्या स्थानिक रंगीत एका कोंबडीच्या जाती पासून तयार करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ही कोंबडीची जात शेतकऱ्यांसाठी खूप वरदान ठरेल.
जबलपूर येथील नानाजी देशमुख प्राणी विद्यापीठाने विकसित केली नर्मदा निधी नावाची कोंबडीची प्रजात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जबलपूर येथील नानाजी देशमुख प्राणी विद्यापीठाने नर्मदा निधी नावाची कोंबडीची प्रजात विकसित केली असून ती कडकनाथ आणि जबलपूर येथील स्थानिक रंगीत कोंबडीच्या जातीपासून विकसित करण्यात आलेली आहे.
याबद्दल अधिकची माहिती देताना खरगोन येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉक्टर सुभाष खन्ना यांनी माहिती देताना सांगितले की, नर्मदा निधी प्रजातीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार असून या कोंबडीमध्ये कडकनाथ कोंबडीचे 25% आणि जबलपूर येथील स्थानिक रंगीत कोंबडीचे 75 टक्के गुण आहेत.
तसेच या नर्मदा निधी प्रजातीच्या कोंबडीचा जलद वाढीचा दर आणि उच्च अंडी उत्पादनात क्षमता यामुळे ती इतर प्रजातीपेक्षा नक्कीच फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे या कोंबडीचे मांस आणि अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असून ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
नर्मदा निधी कोंबडीची वाढ तसेच अंडी व मांस उत्पादन क्षमता
नर्मदा निधी जातीच्या कोंबडीचे वजन केवळ अडीच महिन्यामध्ये 800 ते 900 ग्रॅम पर्यंत पोहोचते व 140 दिवसांमध्ये ती दीड किलो किंवा सव्वा किलो वजनाचे होते. याचा अर्थ ही कोंबडीची प्रजात झपाट्याने वाढते आणि कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन द्यायला सुरुवात करते.
जर आपण नर्मदा निधी जातीच्या कोंबडीचे दरवर्षी अंडी उत्पादन पाहिले तर ते 170 ते 190 अंड्यांपर्यंत आहे. त्या तुलनेत आपण स्थानिक कोंबड्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर ते फक्त 45 ते 50 अंडी देतात. याचाच अर्थ नर्मदा निधी प्रजातीच्या कोंबडीचे पालन हे मांस आणि अंडी उत्पादन या दोन्हींच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल.
तसेच या कोंबडीचे मांस चवदार आणि पौष्टिक असून त्यामध्ये कमी चरबी आणि प्रथिने त्यासोबतच लोहासह इतर पोषक घटक असतात व त्यामुळे कुपोषणाची समस्या दूर होण्यास देखील ती फायदेशीर ठरते.
ही जात कमी वेळेत जास्त उत्पादन देते व त्यामुळे शेतकरी कमी गुंतवणुकीवर देखील चांगला नफा मिळवू शकतात. तसेच या कोंबडीची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे व पावसाळ्यामध्ये जे इतर आजारांचा कोंबड्यांना धोका असतो तो या प्रजातीला नाही.