Krushi news : शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात आता मोठा आमूलाग्र बदल बघायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या (Farmer Income) अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.
यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा देखील होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जाधव कुटुंबांला देखील आंबा फळबाग लागवडीचा (Mango Farming) मोठा फायदा झाला आहे.
जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मौजे गंजेवाडी येथील जाधव कुटुंबीयांनी मायबाप शासनाच्या मनरेगा योजनेच्या माध्यमातून बांधावर आंब्याची लागवड (Mango Orchard) केली आहे.
विशेष म्हणजे बांधावर आंब्याची लागवड केलेली असतानादेखील जाधव कुटुंबीयांनी चांगल्या दर्जाचे आंब्याचे उत्पादन घेतले असून आंबा आता थेट अमेरिकेला निर्यात (Mango Export to America) केला गेला आहे. जाधव कुटुंबियांना बांधावरच्या आंब्यातुन सुमारे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
शिवाजी ज्योती जाधव हे मौजे गंजेवाडी येथील रहिवासी शेतकरी. खरं पाहता शिवाजी सेवा निवृत्त एसटी कर्मचारी आहेत. मात्र, सेवानिवृत्त झाले म्हणून काळ्या आईची सेवा त्यांनी त्यागली नाही ते आजही आपल्या तीन मुलांसह मोठ्या उत्साहात शेती करतात.
त्यांच्या तिन्ही मुलांनी दहा एकर क्षेत्रात चांगले निर्यातक्षम द्राक्ष बागांची जोपासना केली आहे. याशिवाय शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत त्यांनी बांधावर आंब्याची लागवड देखील केली आहे.
जाधव कुटुंबाने बांधावर लागवड केलेल्या आंब्यांना पाच वर्ष झाले असून त्यापासून आता दर्जेदार उत्पादन देखील त्यांना मिळू लागले आहे. जाधव कुटुंबीयांनी आपल्या 36 एकर क्षेत्रावर असलेल्या शेती बांधावर जवळपास 630 आंब्याची झाडे लावली आहेत.
विशेष म्हणजे बांधावर लागवड केली असल्याने जाधव कुटुंबीयांनी या आंब्याच्या झाडांना कधीच पाणी व खत दिलेले नाही. इतर पिकांना पाणी दिले जाते तेव्हा बांधावर लावलेल्या आंब्यांना देखील पाणी मिळते.
मात्र असे असले तरी या 630 आंब्याच्या झाडातुन जाधव कुटुंबीयांनी निर्यातक्षम आंबा उत्पादित केला असून तब्बल साडेचार लाख रुपयांचे आंबे अमेरिकेला निर्यात केले आहेत. बारामतीच्या रेनबो कंपनीने जाधव कुटुंबियांचा आंबा अमेरिकेला निर्यात केला आहे.
या कंपनीने जाधव कुटुंबियांचा आंबा दोनशे रुपये प्रति किलो या दराने खरेदी केला असून यामुळे जाधव कुटुंबीयांना तब्बल साडेचार लाख रुपयांचे उत्पादन बांधावरच्या आंब्याच्या झाडातून मिळाले आहे. विशेष म्हणजे जाधव कुटुंबीयांनी पहिल्यांदा आपला आंबा विदेश वारीला पाठवला आहे असे नाही
तर गत वर्षी देखील जाधव कुटुंबीयांनी उत्पादित केलेला आंबा इंग्लंडच्या बाजारपेठेत पाठवला गेला होता. निश्चितच बांधावर लावलेल्या झाडापासून निर्यातक्षम आंब्याचे उत्पादन घेऊन जाधव कुटुंबीयांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक मोठा आदर्श रोवला आहे.