रब्बी हंगामाची सुरुवात आता काही दिवसांनी होईल व शेतकरी आता रब्बी हंगामाच्या तयारीला येणाऱ्या काही दिवसात लागतील. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर रब्बी हंगामामध्ये मका, तसेच कांदा व ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितले तर महाराष्ट्रातील रब्बी हंगामामध्ये ज्वारी लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
त्यामुळे या रब्बी हंगामामध्ये तुम्हाला देखील ज्वारी लागवड करायची असेल तर जमिनीच्या प्रतीनुसार तुम्ही सुधारित वानांची लागवड करून भरघोस उत्पादन या माध्यमातून मिळवू शकतात.
याकरिता तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रब्बी ज्वारी पिकवणाऱ्या भागातील जमिनीची प्रत कशी आहे यानुसार अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण विकसित केलेले आहेत.
विशेष म्हणजे या विद्यापीठांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ज्वारीच्या वाणाच्या लागवडीतून ज्वारी उत्पादनात 25% ची वाढ झाल्याचे देखील आढळून आले आहे.
रब्बी हंगामात या ज्वारीच्या वाणाची लागवड ठरेल फायद्याची
1- फुले सुचित्रा– या वाणाची शिफारस अवर्षण प्रवन भागात मध्यम जमिनीसाठी करण्यात आलेली असून लागवड केल्यानंतर साधारणपणे या जातीला पक्व होण्यास 120 ते 125 दिवसांचा कालावधी लागतो. या व्हरायटीचे दाणे मोत्यासारखे शुभ्र असते व भाकर तसेच कडब्याची प्रत देखील उत्तम असते. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या व्हरायटीचे सरासरी धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल व कडब्याचे उत्पादन 60 ते 65 क्विंटल कोरडवाहू क्षेत्रामध्ये मिळू शकते. विशेष म्हणजे ही व्हरायटी पानांवरील रोगास तसेच खोडमाशी व खडखड्या सारख्या रोगांना उत्तम प्रतिकारक्षम आहे.
2- फुले वसुधा– ज्वारीची ही व्हरायटी भारी जमिनीकरिता, कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस केलेली असून लागवड केल्यानंतर साधारणपणे 116 ते 120 दिवसात परिपक्व होते. या व्हरायटीचे ज्वारीचे दाणे पांढरेशुभ्र व चमकदार असतात तसेच भाकर व कडब्याची प्रत देखील चांगली असते.
हि व्हरायटी खोडमाशी तसेच खडखड्या रोगांना प्रतिकारक्षम असून उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर कोरडवाहूमध्ये 25 ते 28 क्विंटल प्रति हेक्टर व बागायतीमध्ये 30 ते 35 क्विंटल पर्यंत उत्पादन देते. त्यासोबतच कोरडवाहूमध्ये 55 ते 60 क्विंटल कडब्याचे उत्पादन देण्यास सक्षम असून बागायतीमध्ये 60 ते 65 क्विंटल कडब्याचे प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
3- फुले रेवती– हि व्हरायटी भारी जमिनी करिता व बागायतीसाठी विकसित करण्यात आलेली असून या व्हरायटीचे दाणे चमकदार व पांढरे शुभ्र असतात. तसेच या व्हरायटीची ज्वारीची भाकर चवीने उत्तम असते व कडबा देखील पौष्टिक व पाचक असतो.
ही जात लागवडीनंतर 118 ते 120 दिवसात काढणीस तयार होते. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर हेक्टरी बागायतीमध्ये 40 ते 45 क्विंटल उत्पादन मिळते व कडब्याची 90 ते 100 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.
4- परभणी सुपरमोती– ज्वारीची ही व्हरायटी लागवडीनंतर 118 ते 120 दिवसात काढणीस येते व हेक्टरी 12 ते 13 क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळते व 46 ते 47 क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. तसेच ही व्हरायटी खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगांना मध्यम सहनशील आहे. कडबा व धान्य उत्पादनाकरिता उत्तम असून मराठवाडा विभागाकरिता प्रसारित करण्यात आलेली आहे.
5- परभणी मोती– ज्वारीची ही व्हरायटी देखील उत्पादनासाठी चांगली असून लागवडीनंतर 120 ते 125 दिवसात काढणीस तयार होते व उत्पादन बघितले तर ते 8 ते 9क्विंटल व पंधरा क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. तसेच या ज्वारीचे दाणे टपोरे असतात व चमकदार देखील असतात व भाकर देखील उत्तम प्रतीची असते.
6- परभणी ज्योती– ज्वारीची ही व्हरायटी लागवडीनंतर 125 ते 130 दिवसात काढणीस तयार होते व उत्पादन बघितले तर ते हेक्टरी 15 ते 16 क्विंटल व कडब्याचे उत्पादन हेक्टरी 35 ते 36 क्विंटल इतके मिळते. तसेच ही व्हरायटी मावा किडीस प्रतिकारक्षम असून जमिनीवर लोळत नाही व त्यामुळे नुकसान कमी होते. ज्वारीच्या या व्हरायटीची ओलिताखाली लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.