सोयाबीन आणि भुईमूग पिकांमधील तणांचे मिटेल टेन्शन! रॅलीस इंडियाने आणले ‘हे’ उत्कृष्ट तणनाशक, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
mark plus herbicide

जर आपण शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च पाहिला तर तो प्रामुख्याने पिकांच्या लागवडीनंतर आंतरमशागतीवर मोठ्या प्रमाणावर होत असतो. आंतरमशागतीमध्ये निंदनीच्या कामांकरिता मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते व त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो. याकरिता आता अनेक कंपन्यांनी विविध पिकांवर उपयुक्त ठरतील असे तणनाशक विकसित केले आहेत व या तणनाशकांचा वापर करून शेतकऱ्यांना पिकांमधील तणांचा बंदोबस्त किंवा नायनाट करता येतो.

तणनाशकांच्या वापरामुळे निंदनीचा खर्च कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाचण्यास मदत होते. याच अनुषंगाने जर आपण बघितले तर भारतातील कृषी निविष्ठा उद्योगातील नामांकित असलेली कंपनी रॅलीस इंडिया लिमिटेडने एक महत्वपूर्ण असे तणनाशक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सादर केले असून ते प्रामुख्याने सोयाबीन व भुईमूग या मुख्य पिकातील प्रमुख आणि विविध तणांच्या प्रभावी तण नियंत्रणासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे.

 रॅलीस इंडियाने आणले मार्क प्लस नावाचे तणनाशक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतातील कृषी निविष्ठा क्षेत्रातील प्रसिद्ध असलेल्या रॅलीस इंडिया लिमिटेड या कंपनीने मार्कप्लस नावाचे तणनाशक महाराष्ट्र राज्याकरिता सादर केले असून ते शेतकऱ्यांना सोयाबीन व भुईमूग या पिकातील प्रमुख व विविध तणांच्या नियंत्रणासाठी फायद्याचे ठरणार आहे.

सध्या हे तणनाशक कंपनीच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे व येणाऱ्या काळामध्ये गुजरात तसेच मध्य प्रदेश व अनेक देशातील प्रमुख ठिकाणी देखील ते सादर करण्याचे नियोजन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबत जे काही प्रेझेंटेशन करण्यात आले त्या प्रेझेंटेशनच्या कार्यक्रमामध्ये या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.नागराजन यांनी म्हटले की,

विकसित केलेले मार्क प्लस हे एक शक्तिशाली व सुरक्षित तणनाशक आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सोयाबीन आणि भुईमूग या पिकांमध्ये वापरता येणारे परंतु या पिकांच्या उगवण पूर्व वापर करता येणारे तणनाशक आहे.

प्रगत संशोधनाच्या माध्यमातून दोन सक्रिय घटकांचे फॉर्मुलेशन एकत्रित आणल्यामुळे मार्क प्लस हे तनांमधील ALS या तण वाढीकरिता आवश्यक असलेल्या एन्जाईमला प्रतिबंधित करते आणि पेशी विभाजनासाठी महत्त्वपूर्ण मायक्रोट्यूब्युल निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करते. या सगळ्या गुणधर्मामुळे मार्क प्लस हे तणनाशक विविध प्रकारच्या तणाचे प्रभावी नियंत्रणासाठी योग्य असल्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe