महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कपाशी पिकाची लागवड केली जाते. कपाशी हे महत्वपूर्ण पीक असून जवळपास खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असते. त्यामुळे कपाशी पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवून नियोजन करणे खूप गरजेचे असते.
कपाशी लागवडीपासून प्रत्येक टप्प्यावर आपल्याला व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे असते व हे नियोजन कापसाचे भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात. जर आपण कपाशी पिकाचे महत्त्वाचे टप्पे पाहिले तर त्यामध्ये पिकाला पाते आणि बोंडे लागण्याचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो व या कालावधीमध्ये जर व्यवस्थापन चुकले तर मात्र उत्पादनाला हमखास 100% फटका बसतोच. त्यामुळे हा कालावधी सांभाळणे खूप गरजेचे असते.
कपाशी पिकाला पाते आणि बोंडे लागण्याच्या कालावधीत अशी घ्या काळजी
1- जर आपण कपाशी पिकाचे स्वरूप पाहिले तर अगोदर जेव्हा त्याला फुल येते तेव्हा त्या फुलाचे रूपांतर पाते आणि बोंडांमध्ये होत असते या बोंडांपासूनच कापसाचे उत्पादन मिळते हे आपल्याला माहिती आहे. परंतु गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहिले तर नेमका याच कालावधीमध्ये कपाशीची पाने लाल पडण्याची समस्या उदभवते व यालाच आपण लाल्या रोग असे देखील म्हणतो.
या विकृतीमध्ये पाने गळतात व त्यानंतर फुले व पाते देखील गळतात व उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. त्यामुळे लाल्या रोगाच्या नियंत्रणाकरिता आपल्याला मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे खूप गरजेचे असते व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी देखील आवश्यक असते.
त्यामुळे या कालावधीत कपाशीवर लाल्या रोगाची विकृती येऊ नये याकरिता मॅग्नेशियम सल्फेट एक टक्के म्हणजेच दहा ग्राम त्याच्यासोबत जर युरिया एक टक्के म्हणजेच दहा ग्रॅम प्रतिलिटर पाणी अशा पद्धतीने फवारणी करणे गरजेचे आहे. फक्त यामध्ये काळजी एकच घ्यावी की ही फवारणी करताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या किडनाशकाचा समावेश करू नये.
2- जेव्हा कपाशी पीक फुले लागण्याच्या म्हणजेच फुलोरा अवस्थेमध्ये असते तेव्हा दोन टक्के युरिया किंवा दोन टक्के डीएपी म्हणजेच 20 ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा 19:19:19 पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे अन्नद्रव्यांचे लागवडीच्या 45 व 65 व्या दिवशी फवारणी करणे गरजेचे आहे. त्यासोबतच फुलोरा अवस्थेमध्ये 00:52:34 चार ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे महत्त्वाचे आहे.
3- कपाशी पिकाच्या फुलोरा अवस्थेनंतर त्याला पाते व बोंडे तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते व ही अवस्था उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे व यामध्ये खूप व्यवस्थापन काटेकोर ठेवावी लागते. या कालावधीमध्ये पोटॅशियम नायट्रेट एक टक्का म्हणजेच दहा ग्रॅम प्रतिलिटर पाणी घेऊन फवारणी करणे गरजेचे आहे.
4- बऱ्याचदा नैसर्गिक कारणे किंवा इतर कारणांमुळे देखील पाते व बोंडांची मोठ्या प्रमाणावर गळ होते. हे नुकसान टाळायचे असेल तर तुम्ही एनएए म्हणजेच नेपथ्यालीक ऍसिटिक ऍसिड तीन ते चार मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन पहिली फवारणी करावी व त्यानंतर 15 ते 20 दिवस झाल्यानंतर दुसरी फवारणी घ्यावी.
5- कपाशीचे कायिक वाढ जास्त झाली तर बोंडे खूप कमी प्रमाणात लागतात व परिणामी कापसाचे उत्पादन घटते. त्यामुळे यावर उपाय म्हणून क्लोरमेकॉट क्लोराईड(50% एसएल) या वाढ नियंत्रकाची 10 मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करणे गरजेचे आहे.
6- बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की जेव्हा बोंडांची पूर्ण वाढ होते व त्यानंतर बोंडे सडण्याची समस्या दिसून येते. ही समस्या जर टाळायची असेल तर त्याकरता प्रॉपिकोनॅझोल( 25% इसी) एक मिली किंवा प्रोपीनेब( 70 डब्ल्यूपी) अडीच ते तीन ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
त्यामुळे अशाप्रकारे जर या कालावधीत व्यवस्थापन ठेवले तर नक्कीच पाते व बोंडगळ कमी होते व कापसाच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.