केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेती करिता अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. यामध्ये जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनेक योजनांचा विचार केला यामध्ये मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. यात मुख्यमंत्री कृषी शाश्वत योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ देखील दिला जातो. नेमका हा लाभ कसा दिला जातो किंवा याकरिता अर्ज कसा करावा लागतो व याकरिता लागणारी पात्रता काय इत्यादी बद्दल माहिती आपण बघणार आहोत.
काय आहे नेमके या योजनेचे स्वरूप?
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 अंतर्गत सामूहिक शेततळ्याकरिता व राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक क्षेत्रासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करता येऊ शकतो व आता हे अर्ज सुरू झालेले आहेत. कोरडवाहू जमीन तसेच मुरमाड व डोंगराळ भागातील जमिनीमध्ये बोरवेल किंवा विहिरी जरी खोदल्या तरी पाणी लागण्याची शक्यता खूपच कमी असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेततळे अनुदान योजना किंवा मागेल त्याला शेततळे योजना सुरू करण्यात आलेली आहे.
शेततळे अनुदान योजना 2023 साठी पात्रता
1- शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 0.6 हेक्टर जमिनी असणे गरजेचे आहे.
2- लाभार्थी शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे किंवा सामायिक शेततळे अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
3- लाभार्थी शेतकऱ्यांनी शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण होत आल्यानंतर सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करून घेणे बंधनकारक आहे.
4- या योजनेच्या माध्यमातून जितक्या आकाराच्या शेततळ्याला मंजुरी मिळाले आहे तेवढ्याच आकाराचे शेततळे खोदणे बंधनकारक आहे.
5- शेततळ्याची काळजी किंवा निगा ठेवणे ही शेतकऱ्याची प्राथमिक जबाबदारी राहील.
6- कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे तपासणीसाठी कर्मचारी आल्यानंतर ज्या ठिकाणची जागा निश्चित करण्यात आली आहे त्याच ठिकाणी शेततळे खोदणे शेतकऱ्यांवर बंधनकारक राहील.
7- अनुदान योजनेकरिता लॉटरी लागल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार पुढील तीन महिन्यात काम पूर्ण करणे बंधनकारक असेल.
शेततळ्याच्या लाभार्थ्यांची निवड कशी करतात?
1- दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली असेल तर त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात येते.
2- याव्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळ्यांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड त्यांच्या ज्येष्ठता यादीनुसार प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार निवड करण्यात येईल.
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
लाभार्थ्याच्या आधार कार्ड, जमिनीचा सातबारा आणि आठ अ चा उतारा, शेततळ्याकरिता खरेदी करण्याचे साधन किंवा उपकरणांचे कोटेशन, मान्यता प्राप्त कंपनीचा टेस्टिंग रिपोर्ट( पंप या घटकाकरिता आवश्यक), लाभार्थी इतर प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र, हमीपत्र तसेच पूर्व संमती पत्र व शेतकरी करारनामा हा लॉटरी लागल्यानंतर लागेल व त्यासोबतच बँकेचे पासबुक व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता भासते.
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी आकारमानानुसार अनुदान
1- पंधरा बाय पंधरा बाय तीन– 28 हजार 275 रुपये अनुदान मिळते.
2- वीस बाय पंचवीस बाय तीन– 31 हजार 598 रुपये अनुदान मिळते.
3- वीस बाय वीस बाय तीन– 41,218 अनुदान मिळते.
4- पंचवीस बाय वीस बाय तीन– 49 हजार 671 रुपये अनुदान मिळते.
5- 25 बाय 25 बाय तीन– 58 हजार 700 रुपये अनुदान मिळते.
6- 30 बाय 25 बाय तीन– 67 हजार 728 रुपये अनुदान मिळते.
7- 30 बाय 30 बाय तीन– 75 हजार रुपये अनुदान मिळते.
शेततळे अनुदानासाठी अर्ज कसा कराल?
1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर जाऊन वैयक्तिक शेततळे हा पर्याय निवडून तुम्ही अर्ज करू शकतात.
2- या पोर्टल वर लॉग इन केल्यानंतर सगळ्यात अगोदर शेतकऱ्यांनी अर्ज करताना सिंचन, साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करावे.
3- नंतर वैयक्तिक शेततळे या बाबींची निवड करावी.
4- त्यानंतर पुढील स्टेप मध्ये इनलेट व आउटलेटसह किंवा इनलेट आणि आउटलेट शिवाय यापैकी एक पर्याय तुमच्या गरजेनुसार निवडावा.
5- त्यानंतर शेततळ्याचे आकारमान व स्लोप ची निवड करावी.
अशा पद्धतीने अर्ज भरल्यानंतर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते व तसा एसएमएस शेतकऱ्यांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर पाठवण्यात येतो. जेव्हा लॉटरी लागते तेव्हा संबंधित कागदपत्रे अपलोड करणे तसेच पूर्व संमती घेणे व कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याकडून स्थळ तपासणी इत्यादी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक अकाउंट वर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते.