व्यक्तीची मानसिक स्थिती पाहिली तर ती प्रामुख्याने अशी असते की, जर एखादी स्थिरस्थावर नोकरी किंवा व्यवसाय असेल व त्यातून जर आपल्याला चांगला पैसा मिळत असेल तर तो व्यवसाय किंवा नोकरी सोडून दुसरी एखादी गोष्ट करणे हे कोणालाच आवडत नाही.
कारण स्थिरस्थावर मार्ग सोडून एखाद्या बेभरोशाचा मार्ग स्वीकारून त्यावर वाटचाल करण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. परंतु ही गोष्ट करायला आताची तरुणाई मात्र मागे पुढे पाहत नाहीत. आपल्याला असे अनेक तरुण-तरुणी दिसून येतात की त्यांनी चांगल्या पगाराच्या नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण केले व व्यवसाय मोठ्या प्रमाणावर यशस्वी देखील करून दाखवला.

अशी अनेक उदाहरणे आपल्याला समाजात दिसून येतात व त्यातील एक उदाहरण जर आपण घेतले तर ते उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद येथील अजित त्रिपाठी या तरुण शेतकऱ्याचे घेता येईल. दुबईतील व्यवसाय सोडून भारतात येऊन डेअरी फार्म सुरू केला व त्यातूनच तो लाखो रुपये मिळवत आहे.
अजित त्रिपाठी या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवासी असलेले अजित त्रिपाठी हे उच्चशिक्षित असून त्यांनी एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. एमबीए केल्यानंतर त्यांनी 2013 यावर्षी त्यांचे काका प्रदीप त्रिपाठी यांच्या दुबईतील मोबाईल व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली व मस्कत या ठिकाणी तीन वर्ष मोबाईलचा व्यवसाय सांभाळला.
परंतु यामध्ये मन लागत नसल्याकारणाने त्यांनी डेअरी व्यवसाय करावा म्हणून गावी यायचे ठरवले.या सगळ्या व्यवसायाविषयी त्यांनी काका व घरच्यांची चर्चा केली व भारतात परत येऊन त्यांच्या पंडारा या गावी सन 2016 मध्ये श्री गंगाधाम गोशाळेची स्थापना केली. त्यांच्या श्री गंगाधाम गोशाळेचे शुद्ध देसी दुधाची आज राज्यात सर्वत्र चर्चा दिसून येते.
आज आहे 450 जनावरांचा गोठा
अजित त्रिपाठी यांनी तब्बल 24 बिघा क्षेत्रामध्ये गोठा उभारण्याचे ठरवले व या क्षेत्रात गोठा उभारून त्यामध्ये आधुनिक सुविधा आणि यंत्र सामग्री बसवली. त्यांच्या या डेरी फार्ममध्ये आठ बिघा परिसरात 250×300 फूट आकाराचे दोन शेड आहेत व यामध्ये गाई व म्हशींची निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
या व्यवसायाची सुरुवात त्यांनी 50 जनावरांपासून केली व तीनच वर्षात ती 450 पर्यंत वाढवली आहे. त्यांच्या या गोठ्यामध्ये आज 340 गाई आणि 110 म्हशी असून यासाठी त्यांना दीड कोटी रुपये खर्च आला आहे. अजून देखील जनावरे वाढवण्याचा विचार अजित त्रिपाठी यांचा आहे.
या अत्याधुनिक अशा गोठ्यामध्ये गाईंना राहण्यासाठी शेड आहेच.परंतु त्या शेडमध्ये फॉगर सिस्टम तसेच पंख्यांची सुविधा उभारण्यात आलेली असून हे गोठ्याच्या मध्यभागी एक तलाव देखील बांधण्यात आला आहे व त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये गाई आणि म्हशी तासनतास पाण्यामध्ये डूबण्याचा आनंद घेतात.
तसेच सध्या जनावरांची संख्या वाढल्यामुळे दूध पार्लर देखील उभारले असून या पार्लरमधून 40 पेक्षा अधिक गाईंचे दूध एकाच वेळी काढले जाते व हे काढलेले दूध बीएमसीमध्ये पाईपने गोळा केले जाते.
त्यांच्या या गोठ्यामध्ये 1000 लिटरच्या दोन बीएमसी आहेत. या सगळ्या व्यवसायातून अजित त्रिपाठी हे लाखोत नफा मिळवत आहेत. त्यामुळे इतर तरुण शेतकऱ्यांसाठी अजित त्रिपाठी हे एक प्रेरणा देणारे असून व्यक्तीने ठरवले तर कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकते हे देखील आपल्याला कळते.













