ममुराबाद कृषी संशोधन केंद्रातील संशोधकांनी विकसित केले मूग व उडीदाचे बंपर उत्पादन देणारे वाण! शेतकऱ्यांना होईल फायदा

डॉ. सुमेर सिंग राजपूत यांनी विकसित केलेल्या मुगाच्या फुले सुवर्ण आणि उडदाच्या फुले राजन या वाणांना मान्यता देण्यात आलेली आहे. या दोन्ही वाणांची लागवडीचे प्रात्यक्षिके जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी घेण्यात आली व त्यामध्ये उत्पन्न वाढीसह अनेक फायदे दिसून आले

महाराष्ट्रमध्ये जर आपण खरीप हंगामातील पिकाची स्थिती पाहिली तर यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासोबतच डाळवर्गीय किंवा कडधान्य पिकांमध्ये तूर, मूग आणि उडीद या पिकाची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होत असते.

या तिन्ही पिकांची लागवड मुख्य पीक म्हणून आणि कापूस किंवा सोयाबीन सारख्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून देखील केली जाते. तसेच राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तूर किंवा मूग तसेच उडदाची लागवड शेतकरी करत असतात. अशाच प्रकारे तुम्ही देखील जर मूग आणि उडीद या पिकांची लागवड करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण जळगाव येथील ममुराबाद कृषी संशोधन केंद्रातील संशोधकांनी मूग आणि उडदाचे चांगले उत्पादन देणारे वाण विकसित केले असून त्यांना केंद्रीय उपसमितीच्या माध्यमातून देखील मान्यता देण्यात आलेली आहे.

केंद्रीय पीक मानके, नोंदणी व पिक वाण शिफारस उपसमितीची 92 वी बैठक पार पडली व यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाच्या जळगावच्या संशोधन केंद्रातील डॉ. सुमेर सिंग राजपूत यांनी विकसित केलेल्या मुगाच्या फुले सुवर्ण आणि उडदाच्या फुले राजन या वाणांना मान्यता देण्यात आलेली आहे.

या दोन्ही वाणांची लागवडीचे प्रात्यक्षिके जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील काही ठिकाणी घेण्यात आली व त्यामध्ये उत्पन्न वाढीसह अनेक फायदे दिसून आले व ते लक्षात घेऊन उपसमितीच्या माध्यमातून या दोन्ही वाणाना मान्यता देण्यात आली आहे.

 काय आहे या दोन्ही वाणांची वैशिष्ट्ये?

1- मुगाचे फुले सुवर्ण वाण मुगाचे फुले सुवर्ण वाण उशिरा लागवडीसाठी खूप महत्त्वाचे ठरणारे आहे. या वानाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे वारा तसेच वादळासह मुसळधार पाऊस जरी आला तरी या वाणाचे झाड जमिनीवर आडवे पडणार नाही.

महत्वाचे म्हणजे मुगावरील येणाऱ्या भुरी रोगास हे वाण प्रतिकारक्षम असल्यामुळे उत्पन्नात 20 टक्के वाढ होण्याकरिता पोषक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मूग लागवडीकरिता फुले सुवर्ण हे वाण फायद्याचे ठरणार आहे.

2- उडदाचे फुले राजन वाण उडीद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फुले राजन हे वाण खूप महत्त्वाचे ठरणार आहे. उडीद पिकावर येणारे भूरी रोग व त्यासोबत विषाणू व किटाणूजन्य रोगांवर हे प्रतिकारक्षम असे वाण आहे.

उडीद पिकावर येणाऱ्या शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी देखील फुले राजन वाण उत्तम प्रतिकारक्षम असे आहे. केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, फुलेराजन वाणाची लागवड केल्यास उत्पन्नात 15 ते 20 टक्के वाढ होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe