Sandalwood Farming:- सध्या स्थितीला अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणी नोकरीच्या शोधात वणवण भटकत असताना काही अवलियांनी मात्र हातातल्या सरकारी नोकऱ्या सोडून शेती सारख्या व्यवसायाची करिअर म्हणून निवड केलेली आपल्याला दिसून येते.
स्थिर आणि महिन्याला निश्चित आर्थिक उत्पन्न मिळत असलेली नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायात येणे म्हणजे खूप जोखमीचे आणि धाडसाचे काम आहे. परंतु असे अनेक शेतकरी आपल्याला दिसून येतात की त्यांनी हाताच्या चांगल्या नोकऱ्या सोडून शेतीमध्ये येऊन शेती यशस्वी करून दाखवली आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा शेतकऱ्यांकडून शेती ही परंपरागत पद्धतीने न करता तिला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती आता मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत. ज्याने चक्क पोलीस खात्यातील नोकरी सोडली आणि चंदनाच्या शेतीमध्ये रमला.
पोलिसाची नोकरी सोडून सुरू केली चंदनाची शेती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुर जिल्ह्यातील पदरी बाजार या गावचे रहिवासी असलेले अविनाश हे 1998 मध्ये पोलीस सेवेत रुजू झालेले होते. परंतु या नोकरीमध्ये मन लागत नसल्यामुळे सात वर्षातच त्यांनी पोलीस नोकरीला रामराम ठोकला व 2005 मध्ये राजीनामा दिला.
त्यानंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. परंतु शेतीमध्ये काय करावे? या प्रश्नात असतानाच त्यांनी पांढऱ्या चंदनाची लागवड करायची ठरवले. अविनाश कुमार यादव यांनी 2012 मध्ये पांढऱ्या चंदनाची लागवड करायचे निश्चित केले व प्रयोग म्हणून त्यांनी शेतामध्ये फक्त पाच ते सात चंदनाची रोपे लावली.
या रोपांची वाढ चांगली होऊ लागली व सफेद चंदनाच्या लागवडीमुळे येणाऱ्या भविष्यकाळात चांगला फायदा मिळू शकेल अशी शाश्वती त्यांना आली. त्यानंतर त्यांनी कर्नाटक या राज्यातून 50 सफेद चंदनाची रोपे प्रतिरोप दोनशे रुपये याप्रमाणे खरेदी केले. अविनाश यादव यांचे वैशिष्ट्य असे होते की अगदी लहानपणापासूनच त्यांना शेतीचा लळा होता.
या शेतीत असणाऱ्या आवडीच्या माध्यमातूनच त्यांनी देशातील तब्बल 80 कृषी विज्ञान केंद्र आणि 25 कृषी विद्यापीठांना भेटी दिल्या व या भेटीन दरम्यान शेतीच्या अनेक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या सगळ्या ज्ञानाचा वापर त्यांनी चंदनाच्या शेती करिता केला व आता त्यांनी लागवड केलेले चंदनाची रोपे हळूहळू वृक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
अविनाश कशी घेतात सफेद चंदनाच्या रोपांची काळजी?
अविनाश यांच्या मते सफेद चंदनाच्या झाडांना फारशी काळजी घेण्याची गरज भासत नाही. अगदी ओसाड जमिनीवर देखील तुम्ही त्याची लागवड करू शकतात. त्याकरिता पाण्याची कमीत कमी आवश्यकता भासते. सफेद चंदनाच्या झाडाची उंची 15 ते 20 ft पर्यंत असत व ते पूर्णपणे तयार होण्याकरिता 15 ते 20 वर्षांचा कालावधी जायला लागतो.
जर आपण सफेद चंदनाचा वापर पाहिला तर प्रामुख्याने औषध, साबण, अगरबत्ती, फर्निचर, लाकडी खेळणी, अत्तर आणि हवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो.
एका एकर मध्ये जर तुम्हाला चंदनाची लागवड करायची असेल तर त्याकरिता 410 रोपांची आवश्यकता तुम्हाला भासेल व कमीत कमी दहा फूट अंतर रोपांमध्ये ठेवून तुम्ही लागवड करू शकतात. एका एकरमध्ये सफेद चंदनाच्या लागवडीकरिता तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अविनाश यांना मिळू शकते कोट्यावधींचे उत्पन्न
1998 मध्ये पोलीस सेवेत अविनाश रुजू झाले होते व 2005 मध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा देऊन सुरुवातीला प्रयोग म्हणून अवघ्या पाच रोपांपासून चंदनाच्या शेतीला सुरुवात केली व आज त्यांनी दहा राज्यांमध्ये 50 एकर क्षेत्रात पांढरा चंदनाची लागवड केलेली आहे.
अजून दहा वर्षाचा कालावधी जायचा असून जेव्हा दहा वर्षानंतर चंदनाची झाडे परिपक्व होतील तेव्हा त्यांना या माध्यमातून कोट्यावधींचे उत्पन्न मिळेल अशी देखील अपेक्षा अविनाश यांना आहे.