शेती व्यवसाय म्हटले निसर्गावर आधारित असल्यामुळे अगदी बिनभरवशाचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून जर आपण बघितले तर सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व्यवसायाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांचे पार आर्थिक स्वरूपात कंबरडे मोडलेले आहे.
परंतु या नैसर्गिक परिस्थितीला तोंड देत काही शेतकरी मात्र अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवून अशा परिस्थितीत देखील शेतीतून सातत्याने भरघोस उत्पादन घेऊन लाखो रुपयांमध्ये शेती व्यवसायातून उलाढाल करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यांनी हे साध्य करून दाखवलेले आहे
. शेतीमध्ये वेगवेगळ्या कल्पना राबवून त्या दृष्टिकोनातून जर काम केले तर शेती व्यवसाय एखाद्या उद्योग व्यवसाय पेक्षा कमी नाही. याच मुद्द्याला धरून जर आपण सातारा जिल्ह्यातील निसराळे येथील श्रीकांत घोरपडे या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे.
श्रीकांत घोरपडे यांची शेतीमधील यशोगाथा
श्रीकांत घोरपडे हे सातारा जिल्ह्यातील निसराळे या गावचे रहिवासी असून त्यांनी एमबीए पूर्ण केलेले आहे. शेतीमध्ये प्रामुख्याने ते ऊस आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात व त्यासोबतच ते शेती व्यवसायाशी संबंधित यशस्वी उद्योजक म्हणून देखील ओळखले जातात.
श्रीकांत घोरपडे यांनी एकरी अठरा टन कांद्याचे उत्पादन घेण्याची किमया तर साध्य केलेलीच आहे.परंतु त्यासोबत २५ टन क्षमतेच्या कांदा साठवण गृहाची उभारणी त्यांनी केलेली आहे. एवढा मोठा प्रमाणावर पिकवलेल्या कांद्याची विक्री ते संपूर्णपणे बाजारपेठेची मागणी व आवक याचा अभ्यास करूनच करतात.
त्यासोबत ते औषधी वनस्पती व मसाल्याची पिके देखील घेतात. हा श्रीकांत घोरपडे विविध कंपन्यांना कच्चा माल पुरवतात व तयार पदार्थांचे व्यवस्थित पॅकिंग व ब्रँडिंग करून विक्री देखील करतात. याकरिता त्यांनी सरस आंन्ट्रप्रनर्स कंपनी सुरू केली असून ती संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.
या कंपनीच्या माध्यमातून लहान मुलांसाठी महत्त्वाचा असलेला सत्व कल्प तसेच शतावरी कल्प, खेळाडूंकरिता टॉनिक विटा, शतावरी कुकीज, अश्वगंधा पावडर तसेच शतावरी पावडर, सुंठ तसेच हळद पावडर, लेमन ग्रास आणि आवळा कॅन्डी यासारखे 15 हून अधिक प्रकारचे उत्पादन ते बनवतात.
या सगळ्या उत्पादनांची मार्केटिंग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात व इतकेच नाही तर कृषी विभागाकडून जे प्रदर्शने भरवली जातात त्यामध्ये देखील ते सहभागी होतात.
त्यांनी या सगळ्या व्यवसायासाठी सरकारी योजनांचा कौशल्यपूर्ण रीतीने फायदा मिळवलेला आहे व पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून या व्यवसायासाठी आवश्यक यंत्र सामग्री विकत घेतली.
श्रीकांत घोरपडे यांना या सगळ्या कामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुरस्काराने देखील गौरविण्यात आलेले आहे. त्यांची ही उत्पादने 9 राज्यांमध्ये पाठवली जातात व सध्या त्यांच्या या कंपनीची उलाढाल 30 लाखांपेक्षा जास्त आहे.