राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्राच्या शेजारील विविध गावांतील विहिरी आणि बोरवेल्सची पाणी पातळी कमालीची घटल्याने शेतातील उभ्या पिकांना पुरेसे पाणी देता येत नसल्याने ऊस व चारा पिके करपू लागली आहेत. त्यामुळे मुळा इरिगेशनने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तातडीने मुळा नदी पात्रात पाणी सोडावे व मानोरी, मांजरी बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी मुळा नदी पात्राशेजारील गावांतील लाभधारक शेतकरी वर्गातून होत आहे.
नेहमीपेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्रतेचा असल्याने नदी पात्रातील व बंधाऱ्यातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन पाणी कमी झाले आहे.त्याचबरोबर जमिनीची पाणी पातळी खोलवर गेल्याने विहिरी, बोरवेल्सची पातळीही खालावली आहे, त्यामुळे पंपांनी पाणी खेचणे कठीण झाले आहे आणि काही पंप बंदही पडले आहेत. परिणामी पशुधनासाठी आवश्यक असलेल्या गिन्नी गवत, घास, मका, ऊस व भाजीपाला या पिकांना पाणी देऊन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

गेल्या वर्षी मुळा नदी पात्रात योग्य वेळी पाणी सोडून मानोरी, मांजरीसह मुळा नदीवरील बंधारे भरले गेले होते. मात्र यंदा अद्याप तसे झालेले नाही. दुसरीकडे प्रवरा नदी पात्रात पाणी सोडून तेथील बंधारे भरले गेले आहेत. त्यामुळे राहुरीचे लोकप्रतिनिधी, मुळा इरिगेशन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन मुळा नदी पात्रात पाणी सोडावे व बंधारे भरावेत, अशी मागणी वळण, पिंपरी वळण, मानोरी, आरडगाव, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, चंडकापूर, मांजरी, तिळापुर आदी गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.
या शेतकऱ्यांमध्ये यशपाल पवार, ब्रह्मदेव जाधव, ऋषी जाधव, वाल्मिक डमाळे, अभिमान जाधव , सुनील मोरे, जालिंदर काळे, बाळासाहेब म्हसे, अनिल आढाव, राजेंद्र आढाव, शिवाजी आढाव, पोपटराव पोटे, बापूसाहेब वाघ, रवींद्र आढाव, नवनाथ थोरात, बी. आर. खुळे, ज्ञानेश्वर खुळे, बाबासाहेब खुळे, गोरक्षनाथ डमाळे, बाबासाहेब कारले, मुकिंदा काळे आदींचा समावेश आहे.
काय म्हणतात शेतकरी ?
चालू वर्षी मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यास विलंब झाला आहे. जमिनीची पाणी पातळी घटल्याने बोरवेल व पंप बंद पडले आहेत. पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज आहे. चारा पिकांसाठी वरचेवर पाणी लागते, त्यामुळे तातडीने पात्रात पाणी सोडावे.मानोरी केटी कोरडी पडली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच नदी पात्रात पाणी सोडणे आवश्यक होते. अजूनही वेळ गेलेली नाही. बंधारे भरल्यास केंदळ खुर्द, चंडकापूर, केंदळ बुद्रुक व मानोरी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र आहे, त्यामुळे तातडीने पाणी सोडावे.”