Ahmednagar News : निर्यातबंदीची घोषणा फसवी ! कांद्याचे भाव पुन्हा गडगडून दीड हजारांवर, भाव वाढण्याची शक्यताही मावळली

Ahmednagarlive24 office
Published:

कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू लागला. शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परंतु हा आनंद क्षणभंगुर निघाला. कारण ही निर्यातबंदी अजून उठलीच नाही. निर्यातबंदी जैसे थे असल्याने कांद्याचे भाव पुन्हा रिव्हर्स यायला सुरवात झालीये. अडीच हजार रुपये क्विंटलवर कांद्याचे भाव गेले होते. ते आता पुन्हा दीड हजारांवर आले आहेत.

घोडेगाव बाजार समितीत उच्च प्रतीच्या कांद्याला १,५०० ते १,८०० रुपये क्विंटल दर मिळाला. यापूर्वीच्या लिलावामध्ये तेथे कांद्याला २,५०० ते २,७०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. सोमवारच्या लिलावामध्ये कांद्याला उच्चांकी दर होता.

केंद्र सरकारने निर्यातबंदी हटविल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे दरवाढ झाली होती. परंतु आता ३१ मार्चअखेर निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लागलीच बुधवारी दर क्विंटलमागे ८०० ते १,००० रुपयांनी घसरले असल्याची चर्चा आहे.

दर वाढू शकतील का?

नगर, नाशिक, तसेच मराठवाड्यामध्ये सध्या काही प्रमाणात लाल कांदा, तसेच रांगडा कांदा बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. नगरनंतर घोडेगाव बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक होते. छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या भागातून येथे कांदा विक्रीसाठी येतो.

बुधवारी येथे सुमारे १,२०० टन मालाची आवक झाली. निर्यातबंदीच्या फसव्या चर्चेमुळे शेतकरी विक्रीसाठी कमी प्रमाणात माल आणतील. बाजारातील दर वधारणार नाहीत अशी स्थिती सध्या असल्याचे काही अडतेव्यापारी सांगत आहेत.

…तरच मिळेल शेतकऱ्यांना आर्थिक फायदा

शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा मार्च महिन्यानंतर काढणीसाठी येईल. त्यावेळी निर्यातबंदी हटविण्यात आली, तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील, अन्यथा यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे कांदा उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज असला तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र जास्तीचे पैसे पडू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe