Sugarcane Farming : लवकरच निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून कारखाना परिसरातील गावांमधील शेतीमध्ये फिरणार असल्यामुळे हा परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार आहे. चालू गळीत हंगाम हा अडचणींचा असला तरी इतर साखर कारखान्यांच्या तोडीस तोड ऊसाला भाव देऊ, अशी ग्वाही संस्थापक चेअरमन रविद्र बिरोले यांनी दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील कारखाना कार्यस्थळावरील भक्तनगर येथे श्री गजानन महाराज साखर कारखान्यांचा २०२३-२४ या वर्षीच्या ७ व्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमात कारखान्याचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अश्विनी बिरोले, संचालक शंतनु बिरोले, नंदन बिरोले, संचालक अॅड. रामदास शेजुळ, हरिभाऊ गिते, सुभाष कोळसे, केरुबापू मगर, बी. एन. पवार, गोरक्षनाथ डहाळे यांच्यासह श्रीरामपूर, राहुरी, नेवासा येथील ऊस उत्पादक शेतकरी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याआधी सकाळी श्री गजानन महाराज यांची कारखाना कार्यस्थळावर मिरवणूक काढण्यात आली होती. यानंतर तब्बल दोन ते अडीच तास पुजेच्या दरम्यान चाललेल्या मंत्रोच्चारामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. याप्रसंगी रविंद्र बिरोले व त्यांच्या पत्नी अश्विनीताई बिरोले यांचे हस्ते विधिवत पुजा विधी पार पडला.
यावेळी चेअरमन रविंद्र बिरोले म्हणाले की, अतिशय संघर्षातून या खडकाळ माळरानावर हा कारखाना सुरु केला असून ऊस उत्पादक शेतकरी तोडणी मंजूर वाहतूकदार व कारखान्याचे अधिकारी व कामगार यांच्या बळावर आपण ६ गळीत हंगाम यशस्वी पार पाडले आहेत.
यावर्षी ही आपण जास्ती जास्त गाळप करण्याच्या दृष्टीने नियोजन करत प्रतिदिन ४ ते साडेचार मेट्रिक टन याप्रमाणे कारखाना चालवणार आहे.
भविष्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून कारखाना परिसरातील गावांमधील शेतात फिरणार असल्याने त्या संधीचे सोनं करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होणार असल्याने हा परिसर भविष्यात ऊसाचे आगार होणार असल्याचे बिरोले यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी कारखान्याचे संचालक शंतनु बिरोले यांनी मनोगत व्यक्त केले. तर भाऊसाहेब मंडलिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी व परिसर व इतर तालुक्यातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.