Farmer Success Story: धुमाळ दाम्पत्याने केली अंधत्वावर मात! कष्ट आणि इच्छाशक्तीच्या जोरावर फुलवली द्राक्षबाग, आईचे मार्गदर्शन ठरले मोलाचे

Ajay Patil
Published:
farmer success story

Farmer Success Story:- व्यक्तीमध्ये आत्मविश्वास, काहीतरी करून दाखवायची दुर्दम्य इच्छाशक्ती,अफाट कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नांमध्ये असलेले सातत्य इत्यादी गुण जर असतील तर व्यक्ती कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करत यश मिळवू शकतो.

यामध्ये शारीरिक दृष्ट्या जर व्यक्ती सुदृढ आणि निरोगी असेल तर मात्र त्याला एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवणे खूप सोपे जाते. परंतु जर एखादे शारीरिक व्यंग आणि त्यातल्या त्यात अंधत्व असेल तर मात्र व्यक्तीवर खूप मोठ्या प्रमाणावर मर्यादा येतात.

जर व्यक्तीचे डोळेच शाबूत नसतील तर दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत खूप मोठ्या प्रमाणावर अडचणींना व्यक्तीला सामोरे जावे लागते. परंतु बरेच व्यक्ती समाजामध्ये आपल्याला दिसून येतात की अशा शारीरिक व्यंगांवर किंवा शारीरिक समस्यांवर देखील मात करत यशस्वी होतात.

याच अनुषंगाने आपल्याला या मुद्द्याची प्रचिती निफाड तालुक्यातील दावचवाडी येथील धुमाळ या अंध दाम्पत्याची यशोगाथा पाहिल्यावर येईल. हे दाम्पत्य अंध असून देखील त्यांनी मोठ्या कष्टाने द्राक्ष तसेच टोमॅटो व कांद्याचे पीक घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे.

 आईच्या मार्गदर्शनाने अंधत्वावर मात करत फुलवली द्राक्ष बाग

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील दावचवाडी या गावचे पांडुरंग यशवंत धुमाळ यांचा पालखेड रस्त्यावर 2001 मध्ये अपघात झाला होता व या अपघातामध्ये त्यांचे दोन्ही डोळे त्यांना गमवावे लागले.

परंतु शेतकरी असलेल्या पांडुरंग यांच्यापुढे अंधत्व आल्याने मात्र खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या व शेती करणे त्यांना कठीण झाले. त्यातल्या त्यात तेव्हा त्यांचे लग्न झालेले नव्हते व आता लग्न होईल की नाही हा देखील एक मोठा प्रश्न होता.

परंतु सुदैवाने 2017 मध्ये त्यांचा विवाह हा अंध असलेल्या सविता यांच्याशी झाला. दोघांनी संसार सुरू केला व मनात मात्र इच्छाशक्ती जबर असल्याने अंधत्वावर मात करण्याचे त्यांनी ठरवले व हार न मानता दोन एकर द्राक्ष बाग, कांदा तसेच टोमॅटोची शेती करीत आपल्या कष्टातून त्यांनी द्राक्षांचा मळा फुलवला व त्यासाठी पांडुरंग धुमाळ यांच्या आई सिंधुबाई धुमाळ यांचे मार्गदर्शन त्यांना मोलाचे ठरले.

पांडुरंग यांच्या खांद्याला खांदा लावून सविता या उभ्या राहिल्या व साडेतीन बिगे शेतीमधून त्यांनी यशस्वीपणे उत्पादन तर घेतलेच व दुसऱ्या शेतकऱ्याची दोन एकर शेती अर्ध्या वाट्याने त्यांनी केली आहे. या दंपत्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अंध असताना देखील ते पिकांना पाणी देण्यापासून तर कांद्याला फवारणी,

जनावरांना चारापाणी करणे इत्यादी कामे सरसपणे करतात. एवढेच नाही तर सविता या देखील शेती कामासोबतच घरातील स्वयंपाक व इतर सर्व कामे व्यवस्थित करतात. आईच्या मार्गदर्शनाने त्यांनी शेती करायला सुरुवात केली व अंधत्वावर मात करत यशस्वी देखील ठरले.

यावरून आपल्याला दिसून येते की, व्यक्तीमध्ये जबर इच्छाशक्ती, काहीही करून ध्येय साध्य करण्याची इच्छा व प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe