ज्या ठिकाणी असते हिम्मत तिथेच होते किंमत! ऐन दुष्काळात टोमॅटोवर केला 4 लाख खर्च;आतापर्यंत मिळवले 8 लाखांचे उत्पन्न, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

Ajay Patil
Published:
tomato

मागच्या वर्षी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात देखील पाऊस खूप कमी झाला व संपूर्ण राज्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती व त्यामुळे विहिरी आणि बोरवेल्स कोरड्याठाक पडलेल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यामध्ये काही पिके घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी झाले.

या दुष्काळामध्ये असे अनेक शेतकरी दिसून आले की त्यांनी दुष्काळ असताना देखील काही धाडसी निर्णय घेतले व वेगवेगळ्या पिकांची लागवड करून उपलब्ध पाण्यात चांगले उत्पादन देखील मिळवले. परंतु उपलब्ध पाण्याच्या भरवशावर लाखोंचा खर्च करून एखादे पिक लागवडीचा निर्णय घेणे हे पाहिजे तेवढे सोपे नाही.

त्यातल्या त्यात भाजीपाला पिके व यामध्ये टोमॅटो सारखे पिकाची लागवड करणे म्हणजे खूपच धाडसाचे काम आहे. परंतु म्हणतात ना ज्याच्याकडे हिंमत असते त्याचीच किंमत होत असते. अगदी याच उक्तीला साजेशे काम हे पुरंदर तालुक्यातील वीर या गावचे शेतकरी प्रताप धुमाळ यांनी करून दाखवले.

 टोमॅटो लागवडीतून हा शेतकरी झाला लखपती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या वीर येथील शेतकरी प्रताप धुमाळ यांनी दुष्काळ असताना देखील उन्हाळ्यामध्ये टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला. दुष्काळी परिस्थितीवर मात करत त्यांनी टोमॅटो लागवडीचे धाडस केले व यशस्वी उत्पादन देखील मिळवले.

परंतु नियतीने त्यांना साथ दिली व त्यांचा हा धाडसाने घेतलेला निर्णय त्यांना फायद्याचा ठरताना दिसून येत आहे. जेव्हा उन्हाळ्यामध्ये त्यांनी टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला याकरिता त्यांनी सगळ्यात अगोदर जमीन तयार केली व फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोची लागवड केली.

हे धाडस करत असताना त्यांना तब्बल या लागवडीकरिता चार लाखांचा खर्च आला. परंतु हा खर्च त्यांचा वाया न जाता या खर्चापेक्षा दुप्पट ते तिप्पट नफा त्यांना मिळताना सध्या दिसून येत आहे. कारण सध्या टोमॅटोची मागणी बाजारामध्ये चांगली आहे व त्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्यामुळे टोमॅटोच्या एका कॅरेटला 400 ते 500 रुपये दर मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे बाजार भाव चांगला मिळाल्याने प्रताप धुमाळ यांना टोमॅटोच्या माध्यमातून खूप चांगला आर्थिक फायदा होताना दिसून येत आहे.

त्यांनी घेतलेला टोमॅटोला चांगला भाव मिळाला असून आतापर्यंत प्रताप धुमाळ यांनी आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे व आणखी आठ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळेल असा अंदाज प्रताप धुमाळ यांना आहे. त्यामुळे एका डेरिंगने किंवा धाडसाने प्रताप धुमाळ यांना आज लखपती बनवले आहे.

दुष्काळामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी चिंताग्रस्त असताना मात्र  प्रताप धुमाळ यांनी उपलब्ध पाणी आणि परिस्थितीचा चांगला उपयोग करत दुष्काळावर मात करत लाखोंचे उत्पादन मिळवण्यात यश मिळवले आहे.

प्रताप धुमाळ यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की उपलब्ध साधनांचा कौशल्याने वापर करून प्रतिकूल परिस्थितीत देखील व्यक्तीला यश मिळवता येते व त्याकरिता फक्त कष्ट व योग्य नियोजनाची गरज असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe