महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड केली जाते व खरीप हंगामातील कपाशी पिकासोबत सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. साधारणपणे जर आपण महाराष्ट्रातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र पाहिले तर ते 48 ते 50 लाख हेक्टर पर्यंत आहे व यातील सगळ्यात मोठे क्षेत्र हे विदर्भात आहे. विदर्भाच्या खालोखाल महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या भागात देखील सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
त्यामुळे या पार्श्वभूमीवर सोयाबीनचे लागवड क्षेत्र पाहता शेतकऱ्यांना लागवडीकरिता सोयाबीनचे दर्जेदार उत्पादनक्षम बियाणे उपलब्ध व्हावे ही तितकेच गरजेचे आहे. कारण खरीप हंगामातील बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणिती या पिकावर अवलंबून असल्याने दर्जेदार बियाण्याची निवड ही खूप महत्त्वाचे ठरते.
त्यामुळे आपण या लेखामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथील महाराष्ट्रातील मुख्य सोयाबीन संशोधन केंद्र आहे व या सोयाबीन केंद्राच्या माध्यमातून एकूण सहा सोयाबीनचे वाण प्रसारित करण्यात आलेले आहेत व त्यातील आपण दोन वाणाची माहिती घेणार आहोत.
कमी कालावधीत उत्पादन देणारे सोयाबीनचे हे वाण शेतकऱ्यांसाठी ठरतील फायद्याचे
1- पीडीकेवी अंबा– सोयाबीनचे हे वाण लवकर काढणीस येणारे म्हणजेच परिपक्व होणारे वाण असून या वाणाची उत्पादन क्षमता ही जास्त आहे. या व्हरायटीमध्ये तीन दाण्यांच्या शेंगांचे प्रमाण व दाण्याचे वजन इतर सोयाबीनच्या इतर व व्हरायटी पेक्षा जास्त असल्याने शेतकऱ्यांमध्ये हा वाण विशेष प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर इतर सोयाबीनच्या वानांपेक्षा यामध्ये तेल व प्रथिनाचे प्रमाण देखील जास्त आहे.
तसेच या व्हरायटीवर हवामान बदलाचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच अशा बदलत्या हवामानात देखील ही व्हरायटी तग धरून राहते. राष्ट्रीय स्तरावर सोयाबीनचा हा वाण मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांकरिता प्रसारित करण्यात आलेला आहे व याचे प्रसारण वर्ष 2021 आहे.
याची उत्पादन क्षमता हेक्टरी सरासरी 28 ते 30 क्विंटलपर्यंत असून लागवडीनंतर साधारणपणे 94 ते 96 दिवसात काढणीस तयार होतो. तसेच सोयाबीन वरील मुळकुज/ खोडकुज या रोगांना व चक्रभुंगा तसेच खोडमाशी या किडींना मध्यम प्रतिकारक आहे. परिपक्व झाल्यानंतर साधारणपणे दहा ते बारा दिवसांपर्यंत याच्या शेंगा फुटत नाहीत.
2- सुवर्ण सोया– ज्या भागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव किंवा प्रसार जास्त प्रमाणात होतो अशा भागांमध्ये लागवडीस उपयुक्त असा हा वाण आहे. तसेच शेंगांवर व झाडांवर लव असल्यामुळे किडींना प्रतिरोधक करतो. तसेच हा वाण संपूर्ण भारतामध्ये मुळकुज/ खोडकूज या रोगास प्रतिकारक्षम म्हणून ओळखला जातो. घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांमध्ये प्रचलित असलेल्या इतर वाणांपेक्षा 22 टक्के जास्त उत्पादकता या वाणाची नोंदवली गेली आहे.
तसेच इतर वानांपेक्षा शेंगांची संख्या जास्त असते. अखिल भारतीय स्तरावर मध्य प्रदेश, राजस्थान तसेच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यांकरिता 2019 मध्ये प्रसारित करण्यात आलेला वाण असून लागवडीनंतर परिपक्वतेचा कालावधी साधारणपणे 98 ते 102 दिवसांचा आहे. सरासरी उत्पादकता पाहिली तर ती हेक्टरी 24 ते 28 क्विंटल पर्यंत आहे. मुळकुज/ खोडकूज व पानांवरील बुरशीजन्य ठिपके या रोगांना प्रतिकारक असून चक्रभुंगा व खोडमाशीला मध्यम प्रतिकारक आहे. परिपक्व झाल्यानंतर साधारणपणे दहा ते बारा दिवसांपर्यंत या वाणाच्या शेंगा फुटत नाहीत.