Weather Update: उत्तर भारतात काही ठिकाणी उष्णतेचे वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाचा (Rain) जोर सुरूच आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) जारी करण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे आज कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे. आज या भागात वाऱ्यांचा वेग ताशी 20 ते 30 किलोमीटर राहू शकतो.
या राज्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
दुसरीकडे, राजस्थान, पूर्व गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच जोरदार पाऊस (Monsoon) पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, केरळ, तामिळनाडू, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँडमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ फक्त गरज आहे ती हवामानावर लक्ष ठेवण्याची. इतर सर्व राज्यांसाठी ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच पावसाची (Monsoon news) शक्यता नगण्य आहे.
या ठिकाणी परिस्थिती भयंकर
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील उझ नदीत पूरस्थिती आहे. या भागातील डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे. ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील जुनागड ब्लॉकमध्ये मुसळधार पावसामुळे हाटी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यातील देवी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, त्यानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुंदी जिल्ह्यात पाणी साचल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्रात या ठिकाणी कोसळणार पावसाची जोरधार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Update) कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. आज पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. निश्चितच गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही राज्यात कायम आहे.