अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे.
यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द गावात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे.
यामुळे राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द गावात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता. याला नागरिकांनी 100 टक्के प्रतिसाद दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लोणी बुद्रुक गावात सोमवारपासून जंतूनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. करोना रुग्ण संख्येत दुसर्या लाटेत राहाता तालुक्यात अनपेक्षित रुग्ण संख्या वाढत असल्याने शिर्डी,
राहाता आणि लोणी या मोठ्या लोकसंख्येच्या गावातील रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासन आणि स्थानिक प्राधिकरण यांनी जनतेच्या सहकार्याने करोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.
त्यात लोणी बुद्रुक आणि खुर्द गावातील रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने करोनाची हि साखळी तोडण्यासाठी विविध पर्यायांवर विचारविनिमय होऊन रविवार ते बुधवार चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला.
दोन्ही ग्रामपंचायतींनी नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांना दोन दिवसांचा अवधी दिल्याने अत्यावश्यक वस्तूंची खरेदी- विक्री करण्यास वेळ मिळाला.
परिणामी सर्व घटकांनी या जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. रविवार आणि सोमवार दोन्ही गावांतील औषधालये व आरोग्य सेवा वगळता संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस असाच प्रतिसाद मिळण्याचा विश्वास प्रशासन आणि ग्रामपंचायतींना असल्याने करोनाची साखळी तोडण्यात नक्की यश येईल, अशी आशा आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|