अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- वाळू तस्करांच्या फायबर बोटीने तसेच सेक्शन बोटीवर महसुल विभागाने थेट कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे.
कर्जत तालुक्यातील खेड येथे ५ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट तर वाटलूज (ता. दौंड) ३ फायबर बोटी आणि २ सेक्शन बोटी, तर भांबोरा (ता. कर्जत) येथे २ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट अशा एकूण १४ बोटी जिलेटीनच्या साह्याने उद्धवस्त केल्या आहेत.

या कारवाईत वाळूमाफियांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. दौड तालुक्याच्या पूर्व भागात अनेक दिवसांपासून नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता.
या बाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या.यामुळे दाैंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी येथील नदीपात्रात तलाठी, मंडल अधिकारी यांना घेऊन वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर मोठी कारवाई केली.
यात १४ बोटींना जलसमाधी देण्यात आली. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे कंबरडे मोडले आहे.
भीमा नदीतील या काळ्या सोन्याचे तरुणांमध्ये दिवसेंदिवस आकर्षण वाढत आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळण्याच्या अपेक्षेने अनेक तरुण या अवैध धंद्याकडे वळत आहेत.
त्यातून गुंडगिरी, दमदाटी आणि मारामारी असे प्रकार करायला तरुण मागेपुढे पहात नाहीत. या कार्यवाहीमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र समाधान व्यक्त होत आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved