संघटीत गुन्हे करणार्‍या 15 टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून संघटीत गुन्हे करणार्‍या 15 टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार केल्या आहे. त्याचबरोबर वैयक्तिक गुन्हे करणारे 30 सराईत गुन्हेगारही हद्दपार केले आहेत.

तसेच गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर गुन्हे करणार्‍या 11 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, संघटीत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून प्रयत्न केले जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मनोज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, वाळूतस्करी, चोरी, विनयभंग, शिवीगाळ, मारहाण असे गंभीर गुन्हे संघटीतपणे करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाण सक्रीय आहे.

या टोळ्यांविरोधात हद्दपार, मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा धडाका जिल्हा पोलिसांनी लावला आहे. वारंवार गुन्हे करून त्या परिसरात आपली दहशत निर्माण करू पाहणार्‍या सराईत गुन्हेगार, टोळ्यांना पोलीस अधीक्षक पाटील यांनी वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. यातच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत वर्षभरात सहा टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News