Vande Bharat Sleeper : वंदे भारत एक्स्प्रेसला आता लवकरच शयनयान डबे अर्थात स्लीपर ‘कोच जोडण्यात येणार आहेत. या सुसज्ज स्लीपर कोच गाड्यांचे ‘व्यावसाविक उत्पादन पुढील वर्षाच्या जूनपासून टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडच्या उत्तरपारा प्रकल्पामध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
व॑दे भारतची ही स्लीपर ट्रेन सध्या सुरू असलेल्या बंदे भारतपेक्षा वेगळी असेल. यामध्ये बसण्याऐवजी प्रवाशांना झोपण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नव्या स्लीपर कोच गाडीच्या ५०-५५ टक्के सुट्या भागांचे बंगालमध्येच उत्पादन करण्यात येणार आहे.

भेल कंपनीसोबत करण्यात आलेल्या सहकार्य करारामध्ये टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडची ५२ टक्के भागीदारी आहे. रेल्वेने दिलेल्या कंत्राटाचे एकूण मूल्य २४,००० कोटी रुपये आहे. यामध्ये टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेडचा हिस्सा सुमारे १२,७१६ कोटी रुपये आहे. हा करार सहा वर्षांत पूर्ण होईल, असे कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश चौधरी यांनी सांगितले.
चौधरी म्हणाले, वंदे भारत स्लीपर गाडीचे व्यावसायिक उत्पादन जून २०२५ पासून सुरू होईल आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे काम उत्तरपारा प्रकल्पामध्ये सुरू करण्यात आले आहे. यासाठी ६५० कोटी रुपयांची भांडवली व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.
१६ डबे, वेग ताशी १६० कि.मी. वंदे भारत स्लीपर गाडी
१६० किलोमीटर वेगाने धावू शकेल अशा प्रकारे बनवण्यात येणार आहे. या गाडीला १६ डबे असतील आणि एकूण ८८७ प्रवासी प्रवास करू शकतील. या गाडीचा पहिला प्रोटोटाईप दोन वर्षांत तयार होईल. पहिल्या आठ गाड्यांची बांधणी पूर्णपणे उत्तरपारा प्रकल्पामध्ये होईल, तर उर्वरित गाड्या रेल्वेच्या चेन्नई प्रकल्पात तयार होतील, असे चौधरी यांनी स्पष्ट केले.