अहमदनगर Live24 टीम, 8 एप्रिल 2021 :- गेल्या वर्षभरापासून देशावर कोरोनाचे संकट कायम आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात अचानक लॉकडाऊन करण्यात आला होता.
त्यात एसटीची वाहतूक देखील बंद करण्यात आली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात प्रवासीच नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.
कोपरगाव आगाराला २०१९- २० या आर्थिक वर्षात ३२ कोटींचे उत्पन्न झाले होते. गेल्या वर्षभरात बसेस बंद राहिल्याने फक्त १० कोटींचे उत्पन्न झाले आहे.
यातून तब्बल २२ कोटींचा तोटा झाला आहे. यामुळे बससेवा मोठ्या आर्थिक संकटात सापडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातच पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशी क्षमता अर्ध्यावर करण्यात आली आहे.
यामुळे पुन्हा एकदा परिवहन महामंडळाचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. कोपरगाव आगारातून दुसरा लॉकडाऊन जाहीर होण्याच्या अगोदर बसेसच्या दररोज १८० फेऱ्या सुरू होत्या.
त्यातून सुमारे २० हजार किलोमीटर अंतर कापले जात. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या फेऱ्या निम्म्यावर म्हणजेच, ९० इतक्या केल्या आहेत. त्यामुळे आता फक्त ९ हजार किलोमीटर अंतर कापले जात आहे.
शासनाने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. परंतु, बाजारपेठा, मंदिरे, पर्यटनस्थळ, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
त्यामुळे वाहतूक करताना प्रवासीच नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगारातून धावणाऱ्या बसेसच्या फेऱ्या कमी करण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|