महाविकास आघाडी सरकार मधील आणखी ३ मंत्रीही अडचणीत येणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :- राज्याच्या राजाकारणात खळबळ उडवून देणाऱ्या काही घटना गेल्या महिनाभरात घडत आहेत बडतर्फ पाेलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला.

या गृहमंत्र्यांची पाठराखण करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.

गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याने वाझेच्या वसुलीचे प्रकरण संपणार नाही, तर शिवसेेनेचे राज्यमंत्री अनिल परब यांच्यासह अजून तीन मंत्र्यांचा संबंधही लवकरच स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मंत्र्यांची नावे मात्र त्यांनी सांगितली नाही. साेमय्या म्हणाले, ‘टीआरपी घोटाळा, मनी लाँडरिंग, बिटकॉइन, पोलिसांच्या बदल्यांसह अनेक प्रकरणांत २० हजार कोटींवर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.

गृहखात्यात केवळ अनिल देशमुख सगळे पैसे ठेवत होते का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतरही कोणी लाभार्थी होते का, याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

एनआयएच्या तपासात विविध एजन्सी सहभागी होतील तेव्हा अनेक मंत्र्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट होईल,’ असा दावाही त्यांनी केला. सचिन वाझे याची २० जून २०२० नंतर नियुक्तीची फाइल क्राइम ब्रँचमार्गे ‘आयसीयू’त गेली म्हणजेच गायब झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

ठाकरे सरकारचा वसुलीचा धंदा पूर्ण बाहेर आल्यानंतर अजून धक्कादायक माहिती बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाचे आदेश डावलून ठाकरे सरकारने वाझेंची नियुक्ती केल्याने त्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप सोमय्यांनी केला.

या पत्रकार परिषदेला खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव बापू घडमोडे, अनिल मकरिये, समीर राजूृरकर, प्रशांत देसरडा आदींची उपस्थिती होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe