अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदम विरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात छिंदम विरोधात न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किरण सुरसे यांनी दिली. तोफखाना पोलिसांनी गृह विभागाकडे दोषाराेपपत्र सादर करण्याची परवानगी मागितील होती.
गृ़ह विभागाचे उपसचिव संजय खेडेकर यांनी परवानगी दिल्यानंतर छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फेब्रुवारी २०१८ मध्ये छिंदमने महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन करून वाद घातले होते.
छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी ऑडीओ क्लिपमधील आवाज आणि छिंदमच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. ऑडीओ क्लिपमधील आवाज हा छिंदमचाच असल्याचे अहवालात नमुद आहे. तो अहवाल देखील पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडलेला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम