राज्याच्या इतिहासातील एक काळा दिवस ! विधानसभेत तुफान राडा; तब्बल 12 आमदारांचं …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  आज दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशला सुरुवात झाली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. 

इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. 

या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. 

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. 

सभागृहातून भाजपा आमदारांचं निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. “विरोधी पक्षांच्या नेत्यांना मी विनंती केली की, आपण बोलताहात तर आपल्या सदस्यांना बसायला सांगा. विरोधीपक्ष नेते हळू आवाजात बोलले, पण त्यांचा माईक सुरु होता.

नाही, नाही बसायचं नाही. माझं पूर्ण लक्ष होतं. ठिक आहे, उभे राहिले. त्यानंतर विरोधीपक्षाने त्यावर सर्व मुद्दे मांडले. तेव्हा सभागृहात शांतता होती. त्यावेळी मी त्यांना सांगितलं, आपण किती बोलताहेत तेवढं बोला. मात्र सरकार जेव्हा आपली बाजू मांडेल तेव्हा शांत राहण्याचं मला वचन द्या.

त्यावर विरोधीपक्षाने सांगितलं ते मेरिटवर बोलत असतील, तर आम्ही ऐकू. विरोधी पक्षनेत्यांचं भाषण पूर्ण झालं. कुठेही आडकाठी नाही. त्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांना मी थांबवलं आणि सांगितलं.

पहिल्यांदा प्रस्ताव वाचा. मग त्यावर भाष्य करा. मग भुजबळांनी प्रस्ताव वाचला. भुजबळांनी विरोधीपक्षाच्या एकाएका मुद्द्याचं स्पष्टीकरण पुराव्यानिशी दिलं. त्यावर विरोधी पक्षाला काही मुद्दे उपस्थित करायचे होते. ते उभे राहिले. गेली ३६ वर्षे सभागृहात मी आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी असं घडलेलं नाही. मी स्वत: आक्रमक आहे. रोखठोक आहे. मला खोटं बोलायला आवडत नाही.

सत्ताधारी पक्षानं दिलेलं उत्तर विरोधीपक्षाला मान्य नसतं. यावेळी व्यासपीठावर काही सदस्य आले. आणि माझ्या समोरचा माईक ओढण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. ताणतणाव झाला की, सभागृहाचं काम दहा पंधरा मिनिटाकरिता तहकूब केलं.” असं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितलं.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली.

यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe