अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- शिर्डी शहरात कोरोनाबाबतचे शासकीय नियम न पाळणाऱ्या ३९ जणांकडून सुमारे २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.
याबाबत लोखंडे यांनी पत्रकारांना सांगितले, की संचारबंदीच्या काळात केलेल्या कारवाईत विनामास्क फिरत असलेल्या लोकांवर कारवाई करून १५ हजार तर निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालवत असलेल्या तीन जणांना दंड करुन तीन हजार तर संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत असलेल्या सहा केसेस करण्यात येऊन तीन हजार रुपये,
असा जवळपास २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकएंड लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सध्या पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
जे लोक नियमांचे उल्लंघन करतील, अशा लोकांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
पोलिसांच्या माध्यमातून शिर्डी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून यासंदर्भात उपाययोजना सुरु आहे. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते, बारकु जाणे यांच्या माध्यमातून शिर्डी शहरात नगर- मनमाड महामार्ग,
शहरातील विविध रस्ते, शहराला मिळणारे रस्ते या ठिकाणी विशेष मोहीम राबवून पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.
यापुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील, असे प्रवीण दातरे यांनी सांगितले.
शनिवार दिनांक १० एप्रिल रोजी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सकाळपासूनच उपाययोजना केल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर सामसूम दिसून येत होती.
वाहतूक शाखेच्या वतीने चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे दुचाकीधारक फिरताना दिसून आले नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|