अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- युवकावर खूनी हल्ला करणारा आरोपी विश्वजित रमेश कासार याला कोतवाली पोलिसांनी फसवणूकीच्या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे. तसेच त्याला न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विश्वजित कासार (रा. वाळकी ता. नगर) व त्याच्या अन्य साथीदारांनी नगर तालुक्यातील वाळकी येथील ओमकार भालसिंग यांच्यावर खूनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर ओमकार भालसिंगचा उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. कासार व त्याच्या अन्य साथीदारांविरूद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हल्ल्यानंतर पसार असलेला विश्वजित कासार याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे अटक केली होती. या गुन्ह्यात कासार याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलेले होते. दरम्यान विश्वजित कासारवर कोतवाली पोलीस ठाण्यात जमीन खरेदीप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी विश्वजित कासार याला ताब्यात देण्याची मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांनी जिल्हा न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली होती. न्यायालयाने तो अर्ज मान्य करीत विश्वजित कासारला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश कारागृह अधीक्षकांना दिले.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved