अहिल्यानगर : टपरी, वडापावची गाडी किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करूनही व्यवसाय करता येतो. त्यासाठी काही कौशल्ये आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचार ठेऊन धडपड करणे आवश्यक असते. उद्योगी माणूसच काहीतरी उद्योग करू शकतो.
असाच विचार मांडताना आपल्यामधील उद्योगी दृष्टिकोनाला व्यावसायिकतेची जोड देण्यासाठीचे मार्गदर्शन करण्याचे काम उद्योगीनामा या पुस्तकातून केलेले आहे, असे मत वाघेश्वरी डेअरीचे संस्थापक-संचालक उद्योजक दीपक लांडगे यांनी व्यक्त केले.

देवग्रो कंपनीचे संचालक आणि लेखक सचिन मोहन चोभे यांनी लिहिलेल्या उद्योगीनामा या व्यावसायिक मार्गदर्शन पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. 24 मार्च 2025) सावेडी येथील जॉगिंग पार्क येथे झाले. त्यावेळी उद्योजक लांडगे यांच्यासह सीए राजेंद्र काळे,
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील, शिवम कॉम्प्युटरचे संचालक संकेत पिसे, लोकरंगचे संचालक महादेव गवळी, निवेदक उद्धव काळापहाड, अमोल बागूल, नीलेश दिवटे, कृषीरंग प्रकाशनच्या संचालिका माधुरी चोभे, सचिन आठरे पाटील, संतोष बारस्कर, सुनील झगडे, मार्या थोरात, अमोल बागूल, पत्रकार अशोकराजे निंबाळकर आदि उपस्थित होते.
उद्योजक दीपक लांडगे यांनी पुस्तकासह एकूण व्यावसायिक मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योजक व व्यावसायिक यांनी सतत सजग राहावे लागते. रिस्क मॅनेजमेंट आणि छोट्यापासून सुरुवात करून मोठ्या व्यवसायात रूपांतर करण्याचा मूलमंत्र सांगण्याचा चांगला प्रयत्न या पुस्तकातून केलेल्या आहे.
तर, सीए राजेंद्र काळे म्हणाले की, व्यवसाय कसा करावा आणि कोणी सांगून होत नसतो. त्यासाठी आपल्यामध्ये असलेले गुण व कौशल्य यासह आत्मिक उर्मी जास्त महत्वाची असते. ज्ञानाला कौशल्याची जोड देऊनच यश मिळू शकते. त्यासाठी वाचन, चिंतन आणि मनन याची आवश्यकता आहे. तोच विचार उद्योगीनामा या पुस्तकातून दिलेला आहे.
नव्याने उद्योग-व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी हे एक महत्वाचे पुस्तक आहे. लेखकांनी खूप काळजीपूर्वक सर्व छोट्या-मोठ्या मुद्द्यांना स्पर्श करतानाच अनुभवातून आलेले शहाणपण या पुस्तकात शब्दबद्ध केलेले आहे. लेखक लेखक सचिन मोहन चोभे यांनी पुस्तकाबद्दल माहिती देताना प्रस्ताविकात सांगितले की, वीस वर्षांत घेतलेले उद्योगी आणि निरुद्योगी अनुभव व निर्णय यामुळे मी एक व्यावसायिक म्हणून घडत गेलो.
अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र, आपल्याला आलेले अनुभव आणि झालेल्या चुका यातून इतर वाचकांना बोध व्हावा. नव्याने व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या युवक-युवती आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांनी अशा उद्योगी व धडपड्या पाल्यांना काय आणि कशी मदत करावी याबद्दलचे मुक्तचिंतन उद्योगीनामा पुस्तकातून मांडलेले आहे. त्यामुळे मराठी वाचकांना हे व्यावसायिक मार्गदर्शन करणारे पुस्तक नक्कीच आवडेल याचा विश्वास वाटतो. लवकरच इंग्रजी आणि हिन्दी भाषेतही या पुस्तकाच्या आवृत्ती येणार आहेत.