अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले नुकतेच महसूल वसुलीच्या आढावा बैठकीनिमित्त पारनेर तालुक्यातील सुपा येथे आले होते.
बैठकीनंतर त्यांनी दिवसभर थांबून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणांना भेटी देत, अधिकारी- कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांची बैठक घेत कामाची माहिती घेतली. करवसुली वाढविण्याच्या सूचना केल्या.
नंतर नगरपंचायतीतील कामकाजाचा आढावा घेतला. वसुंधरा योजना, कचराडेपोबाबत माहिती घेत कारवाईच्या सूचना केल्या.
डॉ. भोसले यांनी तालुक्यातील कोरोनाबाबतची परिस्थिती जाणून घेत, ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी केली. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, नियमांचे काटेकोर पालन करण्याचा आदेश त्यांनी दिला.
तसेच एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या जागेची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. बागायती जमिनी एमआयडीसीसाठी अधिग्रहित करू नयेत, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली.
सुपे येथील जुन्या-नव्या एमआयडीसीतील कंपन्यांना त्यांनी भेटी दिल्या. कारखानदारांच्या समस्या जाणून घेतल्या. कारखानदारांना त्रास देणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना त्यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना केल्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|