३ जानेवारी २०२५ नगर : सोशल मीडियावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडीओ, फोटो, मजकूर (चाइल्ड पोर्नोग्राफी) प्रकाशित केल्याप्रकरणी नगर जिल्ह्यातील ४ जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाल पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या संशयितांची माहिती केंद्र सरकारकडून राज्य पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नगर जिल्ह्यातील ४ इंस्टाग्राम खाते धारकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला.संशयितांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर अवैध मजकूर पोस्ट केला होता.

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (एन.सी.एम.इ.सी.) या यूएस स्थित संस्थेने केंद्र सरकारला संशयितांची माहिती दिली होती. यूएस काँग्रेसने स्थापन केलेल्या एन.सी.एम.इ.सी. कडे केंद्रीकृत अहवाल प्रणाली आहे ज्याद्वारे जगभरातील इंटरनेट सेवा प्रदाते किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, युटूब आणि या सारखे अन्य मध्यस्थ बाल पोर्नोग्राफीच्या प्रतिमा प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची तक्रार करू शकतात.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एन.सी.आर.बी.) या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय एजन्सीने बाल पोर्नोग्राफी, शोषण इत्यादींची माहिती मिळविण्यासाठी एन.सी.एम.इ.सी. सोबत करार केला आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकारने बेकायदेशीर सामग्री अपलोड करण्यासाठी संशयितांनी वापरलेल्या आयपी पत्त्यांबद्दलची माहिती राज्य पोलिसांना पाठविली होती. त्यात ४ इंस्टाग्राम आय डी हे नगर जिल्ह्यातील असल्याने त्यांचा अहवाल नगरच्या सायबर पोलिसांना पाठविण्यात आला.
त्यावरून सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत पो.हे. कॉ. निळकंठ कारखेले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चौघांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ ब (मुलांना लैंगिकरित्या सुस्पष्ट कृत्ये इ. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात दाखविणारी सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो. नि. पेंदाम हे करीत आहेत.