अहमदनगर ब्रेकींग : राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये राडा ; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांसह 12 अटकेत

Published on -

नगर तालुक्यातील दरेवाडीत दोन गटाच्या राजकीय पदाधिकार्‍यांमध्ये राडा झाला. हा वाद भिंगार पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर तेथेही दोन गट भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. आज सकाळी ही घटना घडली.

दरम्यान याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या महिलांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 20 जणांविरूद्ध विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

यामध्ये भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांसह शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍याचा समावेश आहे. तर तिसरी फिर्याद पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये भादंवि कलम 160 नुसार 22 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्या माजी जिल्हाध्यक्षांसह 12 जणांना अटक केली. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे भिंगारचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी सांगितले.

पहिली फिर्याद दिलेल्या महिलेने म्हटले आहे की, दरेवाडीतील वाकोडी फाट्यावर असलेल्या दुकानात आठ जणांचा जमाव आला.

त्यांनी ग्रामपंचायतीच्या पदाच्या अधिकारावरून हुज्जत घालण्यास सुरूवात केली. नंतर विनयभंग करून केबल व लोखंडी साखळीने मारहाण केली.

तसेच दुकानातील रोकड व महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ओरबाडले. यात महिलेसह एक जण जखमी झाला. भिंगार पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद एका विद्यार्थिनीने दिली आहे. एक युवक सतत पाठलाग करून छेडछाड करत होता. त्याला काही राजकीय पदाधिकारी प्रोत्साहन देत होते.

याबाबत जाब विचारण्यासाठी गेलो असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव गोळा करून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली.

गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून नेले. याप्रकरणी पोलिसांनी 12 जणांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. दरेवाडी गावात वाद झाल्यानंतर हे दोन्ही गट भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले.

तेथे दोन्ही गटात वाद झाले. याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत दोन्ही गटाच्या 22 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News