अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- देवदर्शन करून परत येणाऱ्या भाविकांच्या बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने वेगात असलेल्या बसचा अपघात झाला आहे. या अपघातात १२जण जखमी झाले आहेत. ही घटना पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील घाटात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिनी बसने देवदर्शन करण्यासाठी गेलेले भाविक परत येत असताना ते कल्याण अहमदनगर रोडवरील पारनेर तालुक्यातील कार्जुले हर्या येथील घाटात आले असताना या घाटाच्या पहिल्या वळणावर चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले अन वेगात असलेली बस पलटी झाली.
या अपघातात सुमारे १२ जण जखमी झाले.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
याप्रकरणी शरद शांताराम पवार यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बसचा चालक सिराजूल चारीफ अहमद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तर या अपघातात मथाबाई प्रभु कदम (वय ६०), सुजल रमेश ओहळ (वय १६), प्रियंका रमेश ओहळ (वय २२) यांच्यासह नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम