अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- जिल्ह्यातील अहमदनगर नेप्ती उपबाजार समिती, संगमनेर येथील वडगाव पान उपबाजार आणि राहुरी, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा या बाजार समित्यांच्या मुख्य
आवारामध्ये फळे व भाजीपाला (कांदा वगळून) या शेतमालाच्या व्यवहारास बुधवारपासून (दिनांक २६ मे) सकाळी सात ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर विविध अटी आणि शर्तींवर ही परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये, बाजार समिती, उपबाजार समितीतील सर्व व्यापारी, त्यातील नोकरवर्ग, हमाल, मापाडी व कामगार यांची आरटीपीसीआर/रॅपिड अॅण्टीजेन चाचणी बाजार समितीने करावी. त्यास अनुसरुन पास देण्याबाबतची कार्यवाही बाजार समिती, उपबाजार समितीने करावी.
संबंधित बाजार समितीने पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन घ्यावा आणि आवश्यक त्या नियमांचे पालन न करणार्या संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करावी.
मास्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस बाजार समिती आवारात प्रवेश देऊ नये, एका वाहनासोबत वाहनचालक आणि केवळ एका शेतकरयास प्रवेश देण्यात यावा.
बाजार समितीत प्रवेश करण्यापूर्वी वाहनचालक आणि सोबतची व्यक्ती यांची थर्मामीटर आणि पल्स ऑक्सीमीटरद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था बाजार समितीने करावी तसेच प्रवेश द्वारावर हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था करावी.
रिटेल, सर्वसामान्य ग्राहकांना बाजार समिती आवारात प्रवेश देता येणार नाही. व्यवहाराकरिता दिलेली मुदत संपल्यानंतर वेळोवेळी बाजार समिती आवारामध्ये निर्जंतुक फवारणी करण्याची जबाबदारी संबधित बाजार समिती यांची राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
बाजार समितीमध्ये समन्वयक म्हणून संबंधित तालुक्यांचे उप/सहायक निबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर संबंधित बाजार समितीत सामाजिक अंतर आणि कोविड सुसंगत वर्तणूकीचे पालन होईल याची खातरजमा करण्याची जबाबदारी असेल.
बाजार समितीच्या आवारात जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास बाजार समिती बंद करण्यात येईल.
कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतूद आणि भारतीय दंड संहिता १८६० (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सदरचा आदेश दिनांक २५ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक ३१ मे, २०२१ रोजीच्या सकाळी ११ वाजेपावेतो लागू राहणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम