अहमदनगर ब्रेकिंग : नातवाला वाचवताना आजोबांचाही मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  कोल्हेवाडी (ता. संगमनेर) येथील ७ वर्षांचा आरूष गर्दनी येथील आजोबा बबन नाईकवाडी यांच्याकडे आला होता. डोंगराच्याकडेला शेतात कांदा काढण्याचे काम सुरू होते. आरुष तेथून लगतच असलेल्या भाऊसाहेब दामोदर नाईकवाडी यांच्या शेततळ्याजवळ गेला.

तो आंघोळीसाठी शेततळ्यात उतरला. मात्र, पोहता येत नसल्याने गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार आजोबांनी पाहिला. नातवाला वाचवण्यासाठी ते शेततळ्यात उतरले. मात्र, दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. बबन भिकाजी नाईकवाडी (वय ५०) व आरुष राहुल वामन (वय ७‌) अशी मृतांची नावे आहेत. आरुष हा बबन नाईकवाडी यांच्या साडूच्या मुलीचा मुलगा.

गर्दणी शिवारातील डोंगराच्या कडेला एकाबाजूस असलेल्या शेततळ्यात घडलेली ही घटना बराच वेळ कुणाच्या लक्षात आली नाही.

सायंकाळी ५.३० वाजता शेतमालक भाऊसाहेब दामोदर नाईकवाडी हे शेततळ्याकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना हे दोघेजण बुडाल्याचे दिसले. भाऊसाहेब नाईकवाडी यांनी या दुर्घटनेची माहिती गावकऱ्यांना व पोलिसांना दिली.

त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री बबन नाईकवाडी यांच्या पार्थिवावर गर्दनी येथे, तर आरुषच्या पार्थिवावर कोल्हेवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe