अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अंगणात खेळत असलेल्या शिवांगी संतोष वाकचौरे (वय ३) या चिमुरडीचा मंगळवारी बिबट्याने हल्ला करत ठार केले. धांदरफळच्या साकुर मळ्यात ही घटना घडली. वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिसरात रात्री ३ पिंजरे लावले.
१५ दिवसापूर्वी येथे सागर खताळ या मुलावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. येथे लावलेल्या पिंजऱ्यात ८ महिन्याचा नर जातीचा बिबट्या बुधवारी सकाळी पिंजऱ्यात जेरबंद झाला. शिवांशी अंगणात खेळत होती. तिची आई सुवर्णा घराजवळ असलेल्या शेतातून जनावरांसाठी मका काढत होती.
शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शिवांशीवर हल्ला करत जबड्यात धरुन शेतात नेले. सुवर्णाने आरडाओरडा केल्याने घरातील मंडळी बाहेर आली. नागरिक जमा झाले. बिबट्याने तेथून पळ काढला. जखमी शिवांगीला घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाला होता.
धांदरफळला शोकाकुल वातावरणात शिवांगीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी ८ महिन्याच्या नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, वनपाल चैतन्य कासार, संगीत कोंढार, वनरक्षक गजानन पवार, वनमजूर अरुण यादव, ओंकार गोर्डे यांनी बिबट्याला बिबट्याला संगमनेर खुर्दच्या वनवाटिकेत नेले.
हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का? याची शहानिशा अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या भागात आणखी बिबटे असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवल्याने ३ भागात पिंजरे लावण्यात आले आहेत. संगमनेर तालुक्यात नागरिकांवर बिबट्याचे वाढते हल्ले चिंतेचा विषय आहे.
यामुळे दहशतीचे वातावरण आहे. शेतात काम करण्यासाठी शेतकरी वर्ग घाबरत आहेत. पिकांचे नुकसान होत आहे. बिबट्यांची संख्या बघता वन विभागाकडे पिंजरे व साहित्य कमी असल्याची चर्चा आहे. मागणी होऊनही पिंजरे देण्यात टाळाटाळ होत असल्याने अशा घटना वारंवार होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम