अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अंगणात झोपलेल्या माय – लेकरावर तस्कराने वाळू वाहतूक करणारी गाडी घालून जखमी केले आहे. हि धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात घडली आहे.
याबाबत जखमी महिला सुनीता सुनील पवार (वय 30) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत फिर्यादीने म्हंटले आहे कि, मी व माझा 4 वर्षांचा मुलगा दीपक अंगणात झोपलेलो होतो.
यावेळी वाळू वाहतूक करणारी पांढर्या रंगाची गाडी जोरात आली व माझ्या तसेच मुलाच्या अंगावरून गेली. त्यामुळे माझ्या कानाला गंभीर दुखापत झाली. तर गाडीची दोन्ही चाके पायावरून गेल्यामुळे पायालाही दुखापत झाली असून शेजारी झोपलेल्या मुलालाही दुखापत झाली आहे.
यावेळी आम्ही मोठ्याने ओरडल्याने गाडी पुढे जाऊन घरासमोरील पलंगाला धडकली. मोठा आवाज झाल्याने घरातील मंडळी बाहेर आले व त्यांनी गाडीकडे धाव घेतली. यावेळी अनिल उर्फ बाळू नागरे हा गाडी चालवताना नजरेस पडला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
परंतु तो गाडीसह तेथून पळून गेला. त्यानंतर आम्हाला जखमी अवस्थेत कुटुंबियानी उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले होते. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी अनिल उर्फ बाळू नागरे (रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम