अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- मुलाच्या कुटुंबीयांकडून मध्यस्थाने १ लाख ७० हजार रुपये घेऊन एका मुलीशी लग्न लावून दिले गेले होते. मात्र, सहाच दिवसांत रक्षाबंधनाच्या सणासाठी माहेरी जात असल्याचे सांगून नववधू अंगावरील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह पसार झाली.
लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलाही आता पसार झाल्या आहेत. नेवासे येथील रहिवासी संतोष उत्तम बोडखे (३२) हे कापड विक्रीचा व्यवसाय करतात. लग्न जमत नसल्याने त्यांचे नातलग शाेधमाेहीम राबवत हाेते. याच दरम्यान वाळूजजवळील पंढरपूर येथील सुमनबाई साळवे यांनी एक स्थळ असल्याचा निरोप बोडखे व त्यांच्या कुटुंबियांना दिला.
तसेच मुलगी पाहण्यासाठी बोडखे कुटुंबियांना बोलावून घेतले होते. संतोष व त्याच्या नातलगांनी कांचनवाडीत येऊन मुलगी पाहिली. सुमनबाईने त्यांना अंजली पवार यांच्या फ्लॅटवर नेत तिथे वधू शुभांगी प्रभाकर भोयर (२५ रा. रामनगर, एन.२, सिडको) हिची ओळख करून दिली.
यावेळी शुभांगी हिची आई वंदना भोयर, सुमनबाई साळवे, अंजली पवार व तिचा पती अंतोन पवार हे उपस्थित हाेते. मुलीच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने संताेष यांनी त्यांना २ लाख रुपये द्यावेत, असा प्रस्ताव सुमनबाई व अंजली यांनी ठेवला. तडजाेडीअंती १ लाख ७० हजार रुपये देण्याचे ठरले.
त्याच दिवशी म्हणजे २० ऑगस्ट राेजी बजाजनगरात नोटरी करून शुभांगी व संताेष यांचा विवाह लावून देण्यात आला. त्याआधी पैसेही देण्यात आले. लग्नानंतर शुभांगी ही संतोषसोबत नेवासे येथे आली होती. २४ आॅगस्ट रोजी संतोष व शुभांगी यांचा विधिवत पुन्हा विवाह लावण्यात आला.
या वेळी बोडखे कुटुंबियांनी शुभांगीला मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील चैन आदी जवळपास ४० ते ५० हजारांचे दागिने घातले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीने शुभांगीने राखीपौर्णिमेला माहेरी जाण्याचा आग्रह धरला. संतोष याने सासू वंदना भोयर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या दुसऱ्या मुलीच्या प्रसूतीसाठी बाहेरगावी जात असल्याचे सांगितले.
त्यामुळे तिला कांचनवाडीतील अंजली पवार हिच्या घरी सोडण्यास सांगितले. त्यानंतर अंजली पवारने दोन दिवसांपूर्वीच फ्लॅट रिकामा केल्याचे कळले. म्हणून संतोषने शुभांगीला पंढरपुरात सुमनबाई साळवे हिच्या घरी सोडले व तो नेवाशाला निघून गेला.
शुभांगी मध्यरात्रीतून गायब झाल्याचे सुमनबाईने संतोषला मेसेज करून सांगितले. संतोष व त्याच्या नातेवाईकांनी शुभांगीचा शोध घेतला. पण ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर सुमनबाई आणि अंजली पवार या दोघीही फरार झाल्याचे कळले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम