अहमदनगर ब्रेकींग : दोन टोळ्यातील दीड डझन गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार !

Published on -

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासा) आणि पाथर्डी परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणार्‍या दोन टोळ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

सोनईच्या शेजवळ टोळीला दोन वर्षासाठी तर पाथर्डीच्या शेख टोळीला 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचा आदेश अधीक्षक पाटील यांनी पारित केला आहे.

दोन्ही टोळीतील एकुण 18 गुन्हेगारांचा यामध्ये समावेश आहे. सोनई परिसरात दहशत असलेल्या अमोल राजेंद्र शेजवळ (वय 25 रा. सोनई) याच्यासह त्याच्या टोळीतील अक्षय रामदास चेमटे (वय 21 रा. चेमटेवस्ती, घोडेगाव ता. नेवासा) आणि अमोल अशोक गडाख (वय 22 रा. लोहगाव रोड, सोनई) यांना दोन वर्षांकरीता हद्दपार करण्यात आले आहे.

तर पाथर्डी परिसरात दहशत असलेल्या शेख टोळीचा प्रमुख तौफीक उर्फ काल्या निजाम शेख, निजाम शरीफ शेख, लाला शरीफ शेख, मुन्ना उर्फ अमीर निजाम शेख, फारूख शरीफ शेख, असिफ लाला शेख, सुरज शामराव दहिवाले, आफ्रिदी उर्फ जुबेर फारूख शेख,

सोहेल उर्फ छोट्या राजू पठाण, जुबेर शफीक आतार, भैय्या उस्मान शेख, कलंदर मदार शेख, हमीद नजीर शेख, युनुस उर्फ बब्बू शब्बीर शेख (सर्व रा. पाथर्डी) आणि रंगनाथ दिलीप गायकवाड (रा. हंडाळवाडी ता. पाथर्डी) 15 महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार केलेल्या शेजवळ टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, अत्याचार, विक्रीसाठी अग्नीशस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, ठार मारण्याची धमकी देणे असे गंभीर सात गुन्हे सोनई, नेवासा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेेत.

शेख टोळीविरोधात धमकावणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, चोरी करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दारू विक्री करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे 16 गंभीर गुन्हे पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News