अहमदनगर ब्रेकिंग : पावसाचे तांडव, ओढ्या-नाल्यांना पूर; शेतीचे अतोनात नुकसान !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फूनगी, गंगापूर परिसरात पावसाचे दमदार आगमन झाले असून दुबार पेरणीचे संकट टळल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

रविवारी रात्री आंबी, अंमळनेर परिसरात पावसाचे तांडव नृत्य पहायला मिळाले. जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आल्याने ते दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

आंबी परिसरातील सरई भागात ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले असून ओढे पात्र सोडून शेतांमधून पाणी वाहत आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डुकरे वस्तीला पाणी खेटले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंबी-देवळाली प्रवरा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सदर रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले असून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने या पावसाळ्यात रस्ता तग धरतो का याकडे प्रवाशांच्या नजरा लागलेल्या आहेत.

अंमळनेर परिसरातील आंबी-गणेशवाडी रस्ता ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. तेथील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने उभी पिके पाण्यावर तरंगताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अतिवृष्टीमुळे जीवितहानी झाली नसली तर वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News