अहमदनगर ब्रेकिंग : महापालिकेवर भगवा फडकणार ! शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे महापौर होणार…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलेला शब्द खरा ठरला आहे.

अखेर अहमदनगर महापालिकेवर भगवा फडकणार आहे महापौर कोणत्या पक्षाचा होणार, याबाबत गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले खलबते आता थांबले आहेत.

महापौर शिवसेनेचा, तर उपमहापौर राष्ट्रवादीला देण्याचे आज झालेल्या बैठकित निश्चित झाले आहे. अहमदनगरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापही उपस्थित होते. या बैठकीत महापौर पदासाठी शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत झाल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेच्या नगरसेवक रोहिणी शेंडगे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार आहे.

तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या नगरसेवकाला संधी द्यायची, याबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली निर्णय होणार आहे. शिवसेनेकडे रोहिणी संजय शेंडगे, रिता शैलेश भाकरे व शांताबाई दामोदर शिंदे हे तीन नगरसेवक या पदासाठी दावेदार होते.

परंतु सुरुवातीपासून शिवसेनेने शेंडगे यांचे नाव पुढे केले. याबाबत शिवसेनेच्या नगर येथील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच महापौर करायचा, असा निश्चयच शिवसेना नेत्यांनी केला.

मुख्यमंत्री ठाकरे यांनीही महापौर शिवसेनेचाच करू, असा शब्द या शिष्टमंडळाला दिला होता. तो शब्द अखेर खरा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन चर्चा केली होती.

त्यात संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, माजी महापौर भगवान फुलसौदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजीराजे कदम, मा सभागृह नेते अनिल शिंदे, शिवसेना गट नेते संजय शेंडगे हे उपस्थित होते.

असे आहे अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल :-

  • शिवसेना- 23
  • राष्ट्रवादी-18
  • भाजप-15
  • काँग्रेस-5
  • बसपा-4
  • सपा-1
  • अपक्ष-2
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe