अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथे संतुकनाथ बाबांचे समाधी स्थळ आहे. वर्षानुवर्षे बाबांची पूजा आणि आरती करणाऱ्या मंडळाला मठातील आरती व पूजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गावात तणाव निर्माण झाला. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थांकडून स्वयंस्फूर्तीने गाव बंद केले.
जेऊर येथे संतुकनाथ बाबांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्य तसेच परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. बाबांच्या संजीवन समाधीची पूजा व आरती २५ वर्षांपासून संतुकनाथ सेवा मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे. संतुकनाथ सेवा मंडळ गावामध्ये विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवते.
रक्तदान शिबिर, कोरोना काळात किराणा वाटप, गावामध्ये दिंडीचे आयोजन, निवृत्त माजी सैनिकांचा सत्कार समारंभ असे विविध उपक्रम संत एकनाथ सेवा मंडळाकडून आजपर्यंत राबवण्यात आले आहेत.
रविवारी, २५ रोजी रफिक शेख व प्रदीप पवार यांनी मठामध्ये आरती व पूजा करण्यास मज्जाव केल्याने वातावरण चिघळले. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सोमवारी गाव बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला.
या भागातील अवैध व्यवसायाला संतुकनाथ सेवा मंडळाच्या कार्यामुळे लगाम बसल्याने समाजकंटक हे काम करत असून जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन परिसरातील अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम