अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- भाजप नेते आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर जलसंधारणात 650 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘गडाख मुंबईच्या एसी ऑफिसमध्ये बसून कारभार चालवत असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही. जलसंधारण खात्यात गडाख यांच्या काळातील साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणला आहे.
याची जबाबदारी स्वीकारून गडाख यांनी राजीनामा द्यावा,’ अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी केली आहे.मुरकुटे यांनी जलसंधारण विभागात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, ‘नुकत्याच झालेल्या अभिरूप अधिवेशनात विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी जलसंधारण विभागातील साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड केला होता.
त्याची जबाबदारी स्वीकारून गडाख यांनी राजीनामा दिला पाहिजे,’ अशी मागणीही मुरकुटे यांनी केली. बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, “जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पाऊसाने दडी मारली आहे.
15 ते 20 दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं जळू लागली आहेत. शेतकरी आधीच कोरोना महामारीच्या संकटात सापडून आर्थिक अडचणीत आहे.
शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेले उभी पिके जळून चालली आहेत. येत्या 8 दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील.”
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, “मंत्री गडाख यांनी नेवासा तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली आहे. ते आपल्या मतदारसंघात दिसत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात. त्यासाठी मतदारसंघात शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो.
परंतु मंत्रिमहोदय मुंबई येथे एसीमध्ये बसून राहतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आता विसर पडला आहे,” असा आरोप बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम