अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ अधिकाऱ्यांनी हॉटेलचालकाला लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिबलापूर- संगमनेर रस्त्यावर असलेल्या शेडगाव शिवारातील हॉटेल न्यु कॉर्नरच्या मालकाला आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे भासवत हॉटेलची तपासणी करण्याच्या बहाण्याने तीन तोतया अधिकाऱ्यांनी २५ हजार रुपये लुटून पलायन केले.

त्यामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली असून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासात दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

याबाबत सुनिल माधव फड यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की शुक्रवार दि. २८ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मी व माझा भाऊ अनिल हे आमच्या हॉटेलसमोरील अंगणात बसलो होतो. त्यावेळी तेथे महिंद्रा एसयूव्ही (एमएच १५ जीआर ६८८७) ही गाडी आली.

त्या गाडीतून आलेल्या तिघांनी आम्ही उत्पादन शुल्कचे अधिकारी असल्याचे सांगून तुमचे हॉटेल उघडा, आम्हाला रेकॉर्ड चेक करायचे आहे, असे म्हणाले. हॉटेल उघडल्यानंतर हॉटेल का उघडलेस असे त्यांच्यातील एकजण म्हणाला. हॉटेल बंद असून तुम्ही उघडा म्हटल्याने मी उघडले,

असे सांगितल्यानंतर दुसऱ्याने लॉकडाऊनमध्ये हॉटेल चालू असल्याने परमिट रद्द करण्याची धमकी दिली. असे करू नका म्हणताच त्या व्यक्तीने मला बाजूला घेऊन २५ हजार रुपयाची मागणी केली. मी घाबरलेलो असल्याने घरातून २५ हजार रुपये आणून त्या व्यक्तीच्या हातात दिले.

यावेळी त्याच्याबरोबर दोन व गाडीत दोन व्यक्ती बसलेले होते. माझ्याकडून पैसे घेऊन ते घाईघाईने जात असल्यामुळे मला त्याचा संशय आला व मी त्याना थांबण्यास सागितले; परंतु ते माझा आवाज न ऐकताच गाडीत बसून निघुन गेले. त्यामुळे मी व माझा भाऊ अनिल यांनी दुचाकीवरुन त्यांचा पाठलाग केला.

आश्वी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते आमच्या दुचाकीला कट मारुन भरधाव वेगाने निघून गेले. असे तक्रारीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९३/२०२१ नुसार भा.दं.वि. कलम १७०, ३८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

अवघ्या काही तासांत भिमराव वाघमारे व रामेश्वर शिंदे (दोघे रा. सिन्नर, जि. नाशिक) या दोन तोतया अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नयन पाटील, हवालदार काळे, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभिरे, होमगार्ड गुळवे यांच्या पथकाने केली. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe