अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाला हिरण यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोन संशियताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे, उपधीक्षक राहुल मदने, निरीक्षक संजय सानप आदी उपस्थित होते.
दि. १ मार्च रोजी हिरण यांचे बेलापूर येथून अपहरण झाले होते. दि. ७ रोजी त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात रुळाच्या कडेला आढळून आला होता.
त्यानंतर बेलापूर व श्रीरामपूर शहरात बंद पाळण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घाटी (औरंगाबाद) येथील रुग्णालयात पाठविण्यात आला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह आज श्रीरामपूर येथील निवासस्थानी आणण्यात आला होता.
यावेळी सर्वपक्षीय नेते, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबियांसह अनेकांनी घेतली. उपधीक्षक मदने यांनी कुटुंबियांशी स्वतंत्र चर्चा करून त्यांचे मत परिवर्तन केले. यानंतर बेलापूर येथील स्मशानभूमीत हिरण यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सायंकाळी अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले हिरण यांचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच याप्रकरणी बिट्टू उर्फ रावजी वायकर व सागर गंगावणे या दोन संशियताना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत. तपासात आणखी आरोपी निष्पन्न होतील. या दोघांविरुद्ध यापूर्वी रस्ता लूट, मारहाणीसह विविध गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत ४०हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|