कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलाव्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मे महिन्यात इ.5 वी व 8 वीच्या घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाईन घेण्याचा हट्टवाद सोडून पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

अन्यथा जनहिताच्या दृष्टीकोनाने सदर परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले

असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे इ. 5 वी आणि इ. 8 वीची दि. 23 मे ला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाला तीनदा पत्रे देऊन विनंती केली होती. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.

उलट परीक्षा परिषदेने 5 मे ला पर्यवेक्षण व अन्य बाबींचे नियोजन करण्याविषयीचे पत्र पाठवून संभ्रम वाढवला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेलाही याविषयी निवेदन दिल्यानंतर परीक्षा परिषदेने हा विषय शासनाकडे टोलवला असून,

शासन याबाबत निर्णय घेणार असल्याचे शिक्षक परिषदेला पत्राद्वारे सांगितले आहे. शासनाला यापुर्वी तीनदा निवेदन देऊनही शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.

देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकलेल्या असतानाही, तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा हट्ट मुद्दामहून असल्याचा पालक, शिक्षकांमधून विचारणा होत आहे.

या परीक्षेला राज्यभरात एकूण 6 लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. एका परीक्षा केंद्रावर दोनशे ते पाचशे परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षा कोरोनाच्या काळात घेणे धोकादायक आहे.

प्रशासनाने अनेक शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी विविध ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत. तर दि.2 मे पासून 14 जून पर्यंत उन्हाळी सुट्टी देण्यात आलेली असल्यामुळे अनेक पालक त्यांच्या मूळगावी गेले आहेत. काहींनी तसे नियोजन केले आहे.

कोरोनाच्या संकटकाळात लहान मुलांच्या परीक्षा घेऊ नये अशी पालक व शिक्षकांची मागणी असताना देखील परीक्षा घेण्याच्या हट्टवादामुळे संताप व्यक्त होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन

मे महिन्यात इ.5 वी व 8 वीच्या घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षा ऑफलाईन घेण्याचा हट्टवाद सोडून पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे,

तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर,

अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe