अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- लाथा बुक्क्यांनी मारहाण करून विवाहितेचा खून झाल्याची घटना तालुक्यातील कऱ्हे शिवारात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका जणास ताब्यात घेतले आहे. मंगल पथवे (वय ४५) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.
संगमनेर तालुक्यातील कऱ्हे शिवारातील मल्हारवाडी परिसरातील भाऊपाटील सानप यांच्या मकाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाडूरंग पवार यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जावून पाहणी केली.
सदर महिलेचा खुन झाला असल्याचे प्राथमिक पाहणीत त्यांच्या लक्षात आले. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. हे श्वानपथक आरोपीपर्यंत पोहचले. पोलिसांनी कातोरे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
कातोरे व मंगल पथवे (रा. उंचखडक, ता. अकोले) हे कऱ्हे येथे शेतात मजूर म्हणून काम करत होते. दोघांमध्ये झालेल्या वादातून कातोरे याने महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यात तिचा मृत्यु झाला. पोलिसांनी कातोरे याची चौकशी करुन या खुनाचा तपास लावला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|