Ahmednagar Crime News : जेवण नाकारल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेलचे मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन मध्ये घडली.
याप्रकरणी चार जणांबिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अकोले रोडवर असणाऱ्या हॉटेल सेलिब्रेशन मध्ये सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन ते चार तरुण हॉटेलात जेवण करण्यासाठी आले होते.

हॉटेलचे मालक अंकुश अभंग यांनी वेळेचे कारण सांगत जेवण देणे नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेल मालक अंकुश अभंग व हॉटेलचा सुरक्षारक्षक यास मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारामाऱ्या सोडविण्यास आलेल्या एका माजी नगरसेवकालाही तरुणांनी मारहाण केली. हॉटेल मधील टेबल, खुर्च्या, प्लेट, चमचे, ग्लास-वाट्या अस्ता व्यस्त फेकून देत हॉटेलचे नुकसान केले. अंकुश अभंग याच्या जवळील तसेच ४० हजार रुपयांची दिड तोळ्याची सोन्याची चैन आणि ३० हजार ७०० रूपये रोख रक्कम, असे ७० हजार ७०० रूपये हिसकावून पळून गेले.
याबाबत हॉटेल सेलीब्रेशनचे मालक अंकुश अभंग यांनी शहर पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी योगेश सुर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे व दिपक रणसुरे यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.