अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेदाची चिन्हे दिसू लागली आहेत.
कृषिमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्यात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
सध्याचे पालकमंत्री मुश्रीफ त्यांच्याऐवजी शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांना नगरचे पालकमंत्री करावे, अशी मागणी करण्यात आली. यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासनही भुसे आणि कोरगावकर यांनी दिले.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्याविषयी अन्य पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकांमधूनही यापूर्वी नाराजी व्यक्त झाली होती. आता शिवसेनेने यामध्ये जाहीरपणे उडी घेतली आहे.
सध्या नगर जिल्ह्यात १२ पैकी राष्ट्रवादीचे ६, भाजपचे ३, काँग्रेसचे २, शिवसेनेचा १ आमदार असे संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यावेळी राष्ट्रवादीकडे देण्यात आले होते. या पदावर कोल्हापूरचे मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्यापासूनच विरोध सुरू झाला होता.
एवढ्या दूरचा पालकमंत्री नको, अशी भूमिका होती.मात्र, त्यांनी जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली. कोल्हापूरमध्ये जास्त काळ कार्यरत असल्याने त्यांना नगरकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, यावरूनही जिल्ह्यातून तक्रारीचा सूर आहे.
आता शिवसेनेने याला जाहीर तोंड फोडले आहे. कृषिमंत्री दादा भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्यात सोनई येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ‘शिवसंवाद’ मेळावा झाला.
त्यामध्ये मंत्री गडाख यांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी पुढे करण्यात आली. या मागणीची दखल घेत कोरगावकर व भुसे यांनी आपल्या भाषणातून सूचक वक्तव्य केली.
कार्यकर्त्यांच्या मागणीलाच पाठिंबा दर्शविणारी ही वक्तव्य असल्याने त्यांचे घोषणा देत स्वागत करण्यात आले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम