अहमदनगर जिल्हा हादरला : एकाच ठिकाणी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील नदीपात्रात एका पुलाच्या नळयात आई व मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ज्योती अंबादास सोनवणे (वय-२९) व दिपक अंबादास सोनवणे (वय-८) अशी मृतांची नावे आहेत.

हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपाताचा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मयत महिलेचा पती ही घटना झाल्यानंतर फरार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती व दिपक सोनवणे हे आई, मुलगा पती अंबादास सोनवणे व महिला असे चार जण घरामधून रविवारी बाहेर गेले होते.

रात्री उशीरा अंबादास सोनवणे हे एकटेच घरी आले. त्याने मुलगी प्रियंका हीच्याकडे तुझी आई व मुलगा घरी आले नाही का असे विचारले. ती नाही म्हटल्यावर प्रियंका हीला घेवून अंबादास सोनवणे हे बोधेगाव पोलीस चौकीमध्ये जावून ज्योती व दिपक सोनवणे हे गायब झाले असल्याची माहिती दिली.

मुलीला घरी सोडून ते काल आईला व मुलाला पाहतो असे सांगून घरामधून निघून गेले. ते पुन्हा घरी आले नाहीत. गावातील नागरीक व नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली मात्र मायलेक कुठेही सापडले नाहीत. रात्री परिसरात पाऊस झाल्याने सकाळी शेवगाव गेवराई रस्त्यावरील ठाकुर पिंपळगाव नदीला पाणी आले.

त्यामध्ये नागरीकांना दोन मृतदेह वाहत येवून पुलाच्या नळयांमध्ये अडकलेले आढळून आले. याबाबत नागरीकांनी पोलीसांना याची माहिती दिली. पोलीस व नागरीकांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले असता त्यांना ते ज्योती व दिपक सोनवणे यांचे असल्याचे निदर्शनास आले.

पोलीसांनी याबाबत अकस्मात गुन्हयाची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत. सोनवणे हे कुटूंब दोन तीन वर्षापूर्वी ऊस तोडणी करत होते. सध्या मात्र ते मोलमजूरी व शेती करुन कुटूंबाचा उदर्निवाह करीत होते. घरामध्ये पती पत्नीचे एका महिलेवरुन सतत वाद होत असल्याचे मुलगी प्रियंका हीने सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe